जुन्नरचा प्राचीन वारसा हबशी महाल

ओंकार महादेव वर्तले

जुन्नर माहीत नाही असा पर्यटक महाराष्ट्रात तरी शोधून सापडणार नाही इतकं महत्त्व या जुन्नरला आहे. पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला असलेला हा तालुका म्हणजे सर्व प्रकारच्या भटक्‍यांची पंढरीच आहे. प्राचीन जीर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जुन्नरमध्ये नाणेघाट-दाऱ्याघाट या सारख्या घाटवाटा तर आहेतच पण याशिवाय हडसर-जीवधन-चावंड सारखे आडवाटेवरचे गड-किल्लेसुद्धा आहेत. शिवनेरी तर आपल्यासारख्यांसाठी तीर्थक्षेत्रच ! शिवछत्रपतींच्या जन्मस्थळाचे वैभव पाहण्यासाठी कितीतरी पर्यटक देशभरातुन येत असतात. या जुन्नरमध्ये लेण्यांची रेलचेल तर आवर्जून पाहण्यासारखी आहे. सुलेमान-तुळजा-अंबा- अंबिका यासारख्या लेण्यांचे कातळी सौंदर्य पाहण्यासाठी रसिकतेने येणारेही कमी नाहीत.धार्मिक अंगाने होणारे पर्यटन हा तर जुन्नरचा गाभाच म्हटलं पाहिजे. लेण्याद्री-ओझर यासारखी ठिकाणे तर भक्तांना नेहमीच आकर्षित करीत अली आहे.याशिवाय म्हैसोबा मंदिर व खंडोबाची मंदिरेही पाहण्यासारखी आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आणि सध्या तर जुन्नरचा नाव विज्ञानाच्या क्षेत्रातही ओळखू जाऊ लागलं आहे; ते खोडद येथील अवकाश दुर्बिणींमुळे! आंतरराष्ट्रीय पातळीवरची संशोधने या केंद्रात होत असतात. त्यामुळे येथे अभ्यासासाठीही अनेक संशोधक जुन्नरच्या भूमीवर येत असतात. असो. हे झालं जुन्नरचं प्रकाशित आणि बऱ्यापैकी सर्वांना माहीत असलेलं पर्यटन.

पण या जुन्नरमध्ये दुर्लक्षित ठिकाणांचीही कमतरता नाही. अशी अनेक ठिकाणे या तालुक्‍यात उभी आहेत कि ज्यांना इतिहासात बरेच महत्त्व होतं.पण कालौघात ती ठिकाणे दुर्लक्षित झाली. आणि आपणही जुन्नरमध्ये आलो कि मोजकीच ठिकाणे पाहून परत जातो. त्यामुळे अशा आडवाटेवर असणारी ठिकाणे चुकू नयेत म्हणून हा लेख प्रपंच. याच पंक्तीत “हबशी महल’ हे ठिकाण आवर्जून येतं.

या हबशी महालाचा इतिहास खूपच जुना. निजामशाहीचा वजीर असलेला मलिक अंबर म्हणजे या महालाचा निर्माता! अंबर हा मूळचा हबशी होता. म्हणजे हि हबशी माणसं आफ्रिकेतल्या इथीपियातून येथे आली. आणि स्वकर्तृत्वावर आणि पराक्रमावर येथे स्वतःचे अस्तित्व राखून होती. अशा या मूळ हबशी असलेल्या या मलिक अंबरने जुन्नर-ओझर रस्त्यावर हबशी महाल उभारला. मुघल शैलीतील एक देखणी कलाकृती म्हणून हा महाल आजही ओळखला जातो. पण सध्या हि हवेली एका खाजगी जागेत असून या परिसराला हापूस बाग असे म्हणतात.

त्यामुळे येथे येण्यासाठी आपल्याला हापूस बागेचाच पत्ता विचारावा लागतो. आंब्याच्या गर्द झाडीत आणि चिंचेच्या घनदाट सावलीत हा महाल लपलेला आहे. एकदा का हापूस बागेत आलो कि या हबशी महालाचे स्थापत्य तुमचे डोळे दिपवते.भले मोठे प्रवेशद्वार असलेला हा महाल दगडी तटबंदीने वेढलेला दिसतो.

सध्या मात्र ही तटबंदी राहिली नाही. पण तिचे अवशेष दिसतात. प्रवेशदारातून आत आलो की, हबशी महालाची भव्य इमारत समोर येते.हवेलीच्या दोन्ही बाजूने बाहेर आलेले सज्जे आणि त्यावरची नाजूक कलाकुसर म्हणजे हॅट्‌स-ऑफच !घडवलेल्या दगडाचं नक्षीकामही पाहण्यासारखं.दगडी पायऱ्यानी आत शिरलो कि मोठे सभागृह दिसते.याच्या छतावरच नक्षीकाम सुंदर आहे. या सभागृहाच्या खिडकीपाशी कमानीही कोरलेल्या दिसतात. हे सभागृह पाहून झालं कि,बाजूच्याच खोलीतून वर जाण्यासाठी निमुळत्या जिन्यांचा अरुंद दगडी पायरी मार्ग आहे.

एका वेळी एकच माणूस जा-ये करू शकेल एवढी त्याची रुंदी आहे.या जिन्याने वर आलो कि आणखी दोन मोठ्या खोल्या पाहायला मिळतात. येथे खेळणारा गार वर हा या खोल्यांची उपयुक्तता सिद्ध करतो. या खोल्यांमधून दिसणाऱ्या जुन्नरचा देखावा अवर्णनीयच! या हवेलीच्या मागेच भला मोठा पाण्याचा बांधीव हौदही दिसतो. हवेलीच्या पै-पाहुण्यांची तहान भागवण्यासाठी हौदही तेव्हढाच तोलामोलाचा हवा त्यामुळेच या हौदाचीही निर्मिती हवेलीबरोबरच झाली असल्याची शक्‍यता आहे. कालौघात या हवेलीची थोडी पडझड झालेली दिसते.

पण अजूनही हिचे देखणेपण पाहण्यासारखे आहे. या अश्‍या देखण्या ऐसपैस हवेलीत शहाजहान त्याच्या छोट्या औरंगजेबाला घेऊन आला होता आणि जवळ-जवळ दोन-अडीच वर्षे तो येथे मुक्कामाला होता असे अनेक इतिहास अभ्यासक सांगतात. असो. जुन्नरच्या अनेक वारसास्थळांबरोबरच ही हवेलीही आवर्जून पहिली पाहिजे.एव्हढेच नव्हे तर या हवेलीचे संवर्धनही होणे काळाची गरज आहे. आडबाजूला असणाऱ्या अशा ठिकाणांची भटकंती ही न चुकवावी अशीच आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)