जुना कालवा फुटण्याचा धोका

हवेलीच्या पूर्व भागातील सोरतापवाडी, उरूळीकांचन येथील स्थिती; पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष

उरूळीकांचन- पुणे शहरात खडकवासला कालवा फुटल्यानंतर (गुरूवार, दि. 27) गेल्या चार दिवसांत पाटबंधारे खात्याची मोठी धावपळ उडाली. कालवा दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येवून रविवारी (दि.30 सप्टेंबर) पुन्हा पाणी सोडण्यात आले असले तरी शहराबाहेरही हा कालवा ठिकठिकाणी ठिसूळ झाला असल्याचे निदर्शनास येत आहे. पूर्व हवेलीतील गावांतील सोरतपावाडी, उरूळीकांचन या ठिकाणी हा कालवा फुटण्याची शक्‍यता असून दौंड, इंदापुरमध्येही बहुतांशी ठिकाणीही कालवा फुटण्याच्या स्थितीत असल्याने दुर्घटना घडण्यापूर्वीच पाटबंधारे पाहणी करावी, अशी मागणी संबंधीत गावांतून होवू लागली आहे.
खडकवासलाचे पाणी हवेली, दौंड ते अगदी इंदापूर पर्यंत जाते. जुन्या बेबी कालव्यातून शेतीकरिता आवर्तने सोडली जातात. या कालव्याचे काम 40 वर्षांपूर्वी झाले आहे. कालव्याची स्वच्छता, भराव टाकणे या सारखी डागडुजीची कामेही झालेली नाहीत. यामुळे हवेली ते इंदापूर पर्यंत ठिकठिकाणी कालव्याची दूरवस्था झाली आहे. पुणे शहरांतर्गत या कालव्याची कामे वेळोवेळी केली जात असल्याचे सांगितले जाते असले तरी शहराबाहेर मात्र पाटबंधारेकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळेच अगदी पुणे शहरालगत असलेल्या पूर्व हवेलीतील गावातही या कालव्याची मोठी दुरवस्था झाली आहे.
लोणीकाळभोर परिसरासह सोरतापवाडी, उरूळीकांचन येथे कालव्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. यामुळे सोरतापवाडी येथे तर पुलाच्या मोऱ्यांनाच धोका निर्माण झाला आहे. तसेच याच ठिकाणी पाणी साचून ते कालव्यातून बाहेर पडत असून कालवा फुटण्याचीही शक्‍यता आहे. पाणी वाहून या ठिकाणी कालव्यावरील रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. कालवा फुटला तर सगळे पाणी गावात शिरून मोठे नुकसान होवू शकते. तसेच, कालव्यालगतची शेतीही पाण्याखाली जावून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो. सोरतापवाडी गावात कालव्यालगत असलेली शेती लक्षात घेता कालवा फुटला तरी शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान होवू शकते.
पुणे शहरातील घटनेनंतर पालकमंत्री गिरीष बापट यांनी कालवा दुरुस्तीचे काम तातडीने करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले. कालवा दुरूस्तीनंतर शेतीसाठी आर्वतन सुरू करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. पुणे शहरात कालवा दुरूस्तीचे काम करण्यात आल्यानंतर पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शुद्धीकरण केंद्रात पाणी सोडण्यात आले आहे तसेच, कालव्यातही पाणी येवू लागले आहे. मात्र, या कालव्याची पूर्ण दुरूस्ती केल्याशिवाय मोठ्या प्रवाहाने शेतीकरिता पाणी येणे शक्‍य नाही. कालव्यातून पाणी सोडणे बंद करूनच कालवा दुरुस्तीची कामे करावी लागणार आहेत, ही दुरुस्ती पक्‍क्‍या स्वरुपाचीच करावी लागेल. तरच, पुणे शहरासारखी घडलेली घटना पुढे कोणत्या गावात घडणार नाही.

 • जलपणी अडकून पाणी कालव्याच्या काठावर येवू लागले आहे. यातून कॉलवा फुटू शकतो.त्यामुळे कालव्याची दुरूस्ती तातडीने करावी. कालव्याचे पाणी बाहेर येवून ते रस्त्यावर साचते. रात्रीच्या वेळी चिखल होवून वाहने घसरत आहेत तर पायी चालणाऱ्यांनाही याचा त्रास होतो.
  या कालव्यामुळे गावातील विहिरी तसेच कुपनलिकांचे पाणी दुषित झाले आहे. तसेच कालवा रात्रीचा फुटला तर गावात मोठी हानी होवू शकते, याबाबी नमूद करून गावातील व्यापारी सेलचे अध्यक्ष शंकर बापू कड, कैलास चोरगे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे तर
 • कालव्याच्या दुरूवस्थेबाबत पाटबंधारे खात्याशी संपर्क साधण्यात आला आहे की नाही. किंवा, यापूर्वी तसे निवेदन देण्यात आले आहे की नाही, याची माहिती घेवून पुढील कार्यवाही केली जाईल. संबंधीत विभागाशी संपर्क साधू.
  – उपसरपंच, स्वाती चोरगे, सोरतपावाडी
  – राजेंद्र चौधरी, ग्रामपंचायत सदस्य, सोरतावाडी
 • जुन्या बेबी कालव्यातील जलपर्णी काढण्याची काम तातडीने होती घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात येईल तसेच दुरूस्ती कामे होण्याबाबतही वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येईल. आवश्‍यक त्या ठिकाणी तातडीने दुरूस्ती केली जाईल.
  – पांडुरंग शेलार, सहाय्यक अभियंता, पाटबंधारे शाखा, उरुळी कांचन
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)