जीवे ठार मारण्याचा प्रयत्न : चौघांना पोलीस कोठडी

पुणे- पुर्वी झालेला वाद मिटविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करत त्याच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्या चौघांना दोन दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.
संदिप महादेव ननावरे (वय 19), इम्रान हसन शेख (वय 21), समर्थ राजेंद्र आढाव (वय 19) आणि तेजस सतीश आढाव (वय 19, चौघेही रा. कसबा पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी यापूर्वी ओंकार रामदास काटकर (वय 25), अमर अशोक काटकर (वय 22, दोघेही रा. कसबा पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. संकेत खांडेकर याच्यावर गुन्हा दाखल आहे. याबाबत ओंकार दीपक तिवारी (वय 27, रा. गणेश पेठ) यांनी फिर्याद दिली. 1 ऑगस्ट रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली.
गाडीला रस्ता देण्यावरून तिवारी आणि आरोपी ओंकार काटकर यांच्यामध्ये वाद झाला होता. हा वाद वाढू नये तसेच झालेली भांडणे मिटविण्यासाठी तिवारी हे काटकर याच्या घराजवळ भेटण्यास गेले होते. त्यावेळी काटकर याने त्याच्या इतर पाच ते सहा साथीदारांसह तिवारी यांना मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तिवारी यांच्यासह त्यांच्या मित्रांच्या दुचाकी फोडून नूकसान केले, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चौघांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी, गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी चौघांना कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)