जीवावर उदार होवून ओलांडावा लागतो रस्ता

चिंचवड – एमआयडीसीची वर्दळ, चार शाळा महाविद्यालये यामुळे कायम गजबजलेला महात्मा बसवेश्‍वर चौक अपघाती झाला आहे. सिग्नल, गतीरोधक आणि वाहतूक पोलीस देखील याठिकाणी नसतात. त्यामुळे जीवावर उदार होवून रस्ता ओलांडण्याची वेळ पादचाऱ्यांवर आली आहे.

चिंचवड औद्योगिक वसाहतीत असलेल्या महात्मा बसवेश्‍वर चौकालगत गीता मंदिर शाळा, छत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय, सी. के. गोयल विद्यालय, के. जे. गुप्ता ज्युनिअर कॉलेज या चार शाळा, महाविद्यालयांमध्ये सुमारे 4 हजार 900 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मोहनगर, रामनगर, काळभोरनगर, आकुर्डी येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांना हा चौक ओलांडून जावे लागते. लहान मुलांसोबत पालकही असतात. त्याचबरोबर लांडेवाडी, भोसरी, चाकण, चिखली, मोशी, कुदळवाडी या भागात दुचाकी, चारचाकी, कामगार बस, मालवाहू वाहने, रिक्षा आदींची दिवस-रात्रं वर्दळ असते. या वर्दळीच्या रस्त्यावर पादचाऱ्यांची परवड होत आहे.

भरधाव वेगात येणारी, बेशिस्त तसेच विरुद्ध दिशेने येणारी वाहने यामुळे या चौकात वारंवार अपघात होत आहेत. विद्यार्थी, पालकांना जीव मुठीत धरुन रस्ता ओलांडतात. येथील बेशिस्त वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण नाही. ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडणे जिकरीचे झाले आहे. सकाळी सव्वा सात, दुपारी सव्वा बारा आणि सायंकाळी सव्वा पाच या शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत या चौकात मोठी गर्दी होते. शालेय बस, विद्यार्थ्यांना नेण्यासाठी आलेले पालक, रिक्षा यामुळे या वेळेत वाहतूक कोंडी होते. या चौकात वाहतूक नियंत्रक दिवा अथवा वाहतूक पोलीस देखील नसतात. त्यामुळे बेशिस्त वाहतुकीला लगाम कोण लावणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

भुयारी मार्गाची मागणी
महात्मा बसवेश्‍वर चौकात वारंवार अपघात होवूनही त्याकडे वाहतूक यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पुर्णवेळ वाहतूक पोलीस नसल्याने बेशिस्त वाहन चालकांचे फावले आहे. त्यातच गतीरोधक, सूचना फलक याठिकाणी नाहीत. त्यामुळे या चौकाच्या चारही बाजूला गतीरोधक बसवावेत, वाहतूक नियंत्रक दिवे लावावेत तसेच पुर्णवेळ वाहतूक पोलीस नेमावेत तसेच यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी भुयारी मार्ग अथवा पादचारी पूल उभारण्याची मागणी पादचाऱ्यांकडून होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)