जीवन समृद्ध करणाऱ्या शिक्षणाची गरज

नितीन गोडसे : राजगुरूनगरात राज्यस्तरीय चर्चासत्र

राजगुरुनगर- आपले जीवन समृद्ध करणाऱ्या, आपल्या जाणिवा विकसित करणाऱ्या शिक्षणाची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील एक्‍सेल गॅस अँड इक्‍युपमेंट प्रा.लि. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नितीन गोडसे यांनी केले.
गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि हुतात्मा राजगुरू महाविद्यालय यांच्यावतीने “उद्योजकता व नेतृत्व विकासात उच्चशिक्षणाची भूमिका’ या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्‌घाटन प्रसंगी गोडसे बोलत होते. याप्रसंगी ऍड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक शांताराम घुमटकर, बाळासाहेब सांडभोर, ऍड. माणिक पाटोळ आणि विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
नितीन गोडसे म्हणाले की, आज पारंपरिक शिक्षणातून जीवन व्यतीत करण्याचा मार्ग सुलभ राहिला नाही. या रूळलेल्या मार्गावर जाऊन जीवनात यशस्वी होता येणार नाही. हे प्रचंड स्पर्धेचे युग असून जे सक्षम आहेत तेच टिकणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्याभिमुख शिक्षणाचा विचार करायला हवा. त्यासाठी सर्वोत्तम शिक्षण घ्या. स्वत:वर विश्‍वास ठेवा. स्वत:चा आदर करा, पूर्ण क्षमतेने काम करा, कामातून समाधान शोधा आणि यातून चांगली कार्यसंस्कृती निर्माण करा, असे आवाहन त्यांनी केले.
या चर्चासत्रात शिवाजी विद्यापीठातील डॉ. ए. डी.जाधव, मुंबई विद्यापीठातील प्रा. मनोज सुपेकर, पुणे विद्यापीठातील डॉ. एम. जी. मुल्ला, डॉ. एम. आर. अवघडे, औरंगाबाद विद्यापीठातील डॉ. सईद अजरुद्दिन, डॉ. नंदकुमार राठी यांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्राचा समारोप प्रसंगी उपप्राचार्य डॉ. एच. एम. जरे, डॉ.टी. जी. गिते, डॉ. व्ही. डी. कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. चर्चासत्रात सहभागी झालेल्या सुमारे 60 संशोधकांच्या शोधनिबंधाचा समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. काजल शहा, प्रा. रसिका तांबे तर प्रा.गणेश धुमाळ यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)