जीवन पोषण (भाग ३)

डॉ. तेजस लिमये, आहारतज्ज्ञ 
दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून साजरा केला जातो. यावर्षीपासून संपूर्ण सप्टेंबर महिना “राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून साजरा केला जावा आणि या काळात भारतातील कुपोषण दूर करण्यासाठी जनजागृती केली जावी, असे नुकतेच केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाकडून जाहीर करण्यात आले. यावर्षीसाठीचा विषय आहे जीवनातील पहिल्या 1000 दिवसांमधील पोषण. 
स्तनपानाबरोबरीने वरचा आहार देण्याचा काळ (6 महिने ते 2 वर्षे) 
1) बाळाला केवळ पातळ पदार्थ देणे / मिक्‍सरमध्ये अतिशय बारीक करून देणे:
वरचे अन्न सुरु करताना सुरुवातीला बऱ्याचदा केवळ पाण्यासारखे पातळ पदार्थ (ज्यूस, वरणाचे / भाताचे पाणी, नारळपाणी) दिले जातात. याची खरंतर काही गरज नसते. अंगावरच्या दूधापेक्षा घट्ट द्रवपदार्थांनी सुरुवात करून बाळाला लवकरच मऊसर अन्न द्यायला हवे. बाळ 7-8 महिन्यांचे झाल्यावर बाळाला जरी दात आले नसतील, तरी बाळाच्या हिरड्या मजबूत व्हायला सुरुवात झाली असते. त्यामुळे मिक्‍सरमधून बारीक करून अतिशय मऊ, गुळगुळीत पदार्थ देण्याऐवजी हाताने कुस्करून मऊ केलेले थोडे चावण्याजोगे पदार्थ द्यायला हरकत नाही. यामुळे बाळ लवकर चावून खायला शिकेल.
2) बाळाच्या खाण्यात जादा साखर, मीठ घालणे : बाळाने आवडीने खावे म्हणून किंवा आपल्याला तशी सवय असते म्हणून बाळाच्याही खाण्यात खूप जास्त प्रमाणात मीठ व साखरेचा वापर केला जातो. खरं तर पहिले 1 वर्ष बाळाला मीठ व साखर न देणेच उत्तम. नंतर देखील अतिशय कमी प्रमाणात या पदार्थांचा वापर करायला हवा जेणेकरून लहानपणापासूनच बाळाला कमी मीठ व साखर खायची सवय लागेल. याचा बाळाला भविष्यात निश्‍चितच फायदा होईल.
3) बाळाला भूक नसतानाही जबरदस्ती भरवणे, टी.व्ही./मोबाईल दाखवत खायला घालणे :
अनेक पालक प्रेमापोटी बाळाला जबरदस्ती खायला घालतात. बाळ नको म्हणते, तोंड फिरवते, तोंडातून बाहेर काढते तरी त्याला नेटाने खायला घालून ताटातले संपल्यावरच थांबतात! अनेकजण बाळामागे घरभर पळत त्याला भरवतात, बाळाचे लक्ष वेधण्यासाठी टी.व्ही., मोबाईल दाखवत खायला घालतात. असे करणे साफ चुकीचे आहे. यामुळे बाळाला खाण्याविषयी प्रेम वाटत नाही. बाळाच्या पोटात भूक नसताना अन्न ढकलून बाळाचे वजन व चरबी जास्त प्रमाणात वाढू शकते. पुढे-पुढे बाळ टी.व्ही./मोबाईल दाखवल्याशिवाय खाईनासे होते! बाळाला एका जागी बसून खायची सवय लावा. बाळाने दरवेळी ठराविक प्रमाणात खायलाच हवे अशी अपेक्षा करू नका. बाळाची भूक कमी-जास्त होते. उन्हळ्यात अथवा बाळाला बरे नसताना भूक मंदावते. बाळाला भूक नसेल तर बाळ नको म्हणते. त्याचा आदर करा. थोड्यावेळाने परत खायला द्या पण जबरदस्ती करू नका.
4) दोन वर्षे पूर्ण होण्याआधी स्तनपान बंद करणे: वरचे अन्न सुरु केल्यावर स्तनपानाचे प्रमाण कमी होते. ते सहाजिकच आहे. पण अनेकवेळा बाळ दोन वर्षाचे होण्यापूर्वीच स्तनपान बंद केले जाते. स्तनपानाचे जसे बाळाला तसेच आईला देखील अनेक फायदे आहेत. त्यामुळे बाळ 2 वर्षांचे होईपर्यंत दिवसातून किमान एक – दोन वेळा स्तनपान सुरू ठेवा.
जसा इमारतीचा पाया मजबूत असणे महत्वाचे; तसे जीवनातल्या पहिल्या 1000 दिवसात आई आणि बाळाचे आरोग्य उत्तम राखणे महत्वाचे! त्यामुळे याबाबतीत सजग होऊन आपले व आपल्या परिचितांचे देखील गैरसमज दूर करूया!

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)