जीवन पोषण (भाग २)

डॉ. तेजस लिमये, आहारतज्ज्ञ 
दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून साजरा केला जातो. यावर्षीपासून संपूर्ण सप्टेंबर महिना “राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून साजरा केला जावा आणि या काळात भारतातील कुपोषण दूर करण्यासाठी जनजागृती केली जावी, असे नुकतेच केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाकडून जाहीर करण्यात आले. यावर्षीसाठीचा विषय आहे जीवनातील पहिल्या 1000 दिवसांमधील पोषण. 
5) चहा-कॉफी- शीतपेयाबाबत काय करावे? चहा-कॉफीमधून अनुक्रमे कॅफेन आणि टॅनिन ही हानिकारक द्रव्ये पोटात जातात. अतिरिक्त कॅफेनमुळे गर्भपात होऊ शकतो. टॅनिन्समुळे लोहाचे शोषण कमी होते, भूक कमी होते. या पेयांमधून कोणतीही पोषकद्रव्ये मिळत नाहीत. शिवाय जादा साखर पोटात जाते. शीतपेयांमध्ये सोडा, कृत्रिम रंग आणि प्रचंड प्रमाणात साखरेचा वापर केला असतो. केवळ गरोदर महिलांनीच नव्हे तर, तर इतरांनी देखील या पेयांपासून लांब रहाणेच उत्तम!
6) वजनवाढीकडे लक्ष न देणे : हल्ली अनेक गरोदर महिलांचे अतिरिक्त प्रमाणात वजन वाढताना दिसते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि गरोदरपणात व्यायाम करायचा नाही, अशी समजूत! गरोदरपणात सर्वसामान्य महिलांचे साधारण 8 ते 12 किलो वजन वाढणे पुरेसे असते. पहिल्या तीन महिन्यांमधे साधारण 1 किलो, पुढच्या 3 महिन्यांमध्ये 3 ते 4 किलो आणि शेवटच्या 3 महिन्यांमधे 5 ते 6 किलो अशी वजनवाढ अपेक्षित असते. ज्या महिलांचे वजन गर्भधारणा होण्यापूर्वीच जास्त असते, त्यांचे वजन इतके वाढले नाही, तरी चालते. त्यामुळे गर्भधारणा झाल्यावर डॉक्‍टरांशी बोलून किती वजन वाढणे पुरेसे राहील, कोणते व्यायाम केलेले चालतील याबाबत माहिती करून घ्यायला हवी. गरोदरपणातील जास्तीच्या वजनवाढीमुळे गरोदरपणात मधुमेह, उच्चरक्तदाब होण्याची शक्‍यता वाढते; प्रसूतिप्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. हे टाळण्यासाठी पहिल्यापासूनच वजनावर लक्ष ठेवायला हवे, वजन जास्त / कमी वाढत आहे असे लक्षात आल्यास आहारतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
7) डॉक्‍टर/आहार तज्ञांच्या सल्ल्‌याशिवाय विविध सप्लीमेंट्‌स, पावडरी घेणे : वेगवेगळ्या पावडरी, सप्लिमेंट्‌सच्या जहिराती पाहून अनेक महिला गर्भारपणात या अनावश्‍यक गोष्टी आहारात घेताना दिसतात. यामुळे फायदा तर नाहीच; पण तोटा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळे डॉक्‍टर/आहारतज्ञांच्या सल्ल्‌याशिवाय कोणतीही सप्लीमेंट्‌स घेऊ नये. गरज असल्यास ते तुम्हाला योग्य प्रकारची सप्लिमेंट्‌स योग्य प्रमाणात (डोस) लिहून देतील.
केवळ स्तनपानाचा काळ (जन्मानंतरचे पहिले 6 महिने) 
1) स्तनपान सुरु करण्यापूर्वी बाळाला मध, साखरपाणी, ग्लुकोजचे पाणी, गुटी देणे : ही अतिशय चुकीची प्रथा आहे. या प्रथेमुळे स्तनपान सुरू करायला विलंब होतो, जंतूसंसर्गाचा धोका वाढतो. पहिले सहा महिने स्तनपान सोडून बाळाला वरच्या पाण्याची देखील गरज नसते.
2) स्तनपान सुरू करण्यास विलंब लावणे : जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्यानुसार प्रसूतिनंतर एका तासाच्या आत स्तनपानाला सुरुवात करायला हवी. अजूनही अनेक ठिकाणी हे होताना दिसत नाही. विशेषतः सिझर झाल्यानंतर अनेकदा दुसऱ्या दिवशी स्तनपान सुरू केले जाते. डॉक्‍टरांनी एक तासाच्या आत स्तनपान सुरु करण्यास प्रोत्साहन द्यायलाच हवे; पण हल्ली अनेक ठिकाणी स्तनपानतज्ञ देखील असतात. तेही याबाबतीत मदत करू शकतात. काही कारणाने/व्यस्ततेमुळे डॉक्‍टरांकडून सांगायला वेळ लागला, तर नातेवाईकांनी व आईनी स्वतः याबाबतीत पुढाकार घ्यायला हवा.
3) स्तनपान अपुरे पडते अशा समजातून वरचे दूध सुरू करणे:
प्रसूतिनंतर पहिले 2 – 3 दिवस आईला दूध कमी प्रमाणात येते. ते घट्ट असून त्याचा रंग पिवळसर असतो. अशा दूधाला “कोलोस्ट्रम’ म्हणतात. त्यात बाळाची प्रतिकारशक्ती वाढवणारी द्रव्ये असतात. त्यामुळे हे दूध बाळाला द्यायलाच हवे. पहिले 2-3 दिवस बाळाला हे दूध पुरेसे असते. “आईला पुरेसे दूध येत नाही’ असे समजून अनेकजण सुरुवातीच्या काही दिवसात वरचे दूध किंवा पावडरींचे दूध सुरु करायची घाई करतात. हे टाळायला हवे. बाळ जितके अंगावरचे दूध पिईल, तितके दुधाचे प्रमाण वाढेल हे कायम लक्षात ठेवायला हवे.
4) वरचे दूध, पाणी देण्यासाठी बाटलीचा वापर करणे: “सोय’ म्हणून अनेकजण बाळांना दूध/पाणी पाजण्यासाठी बाटलीचा वापर करताना दिसतात. हे टाळायला हवे. बाळांना बाटलीची सवय लागते आणि हळूहळू याचे व्यसनात रुपांतर होते! अशी मुले अंगावरचे दूध पिण्याचे टाळतात. बाटलीने दूध पाजण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. बाटलीने दूध देताना अनावश्‍यक प्रमाणात दूध प्यायले जाते. यामुळे बाळांचे वजन अतिरिक्त प्रमाणात वाढण्याचा धोका असतो व भविष्यात अशा बाळांना मधुमेहासारखे आजार होण्याची शक्‍यता जास्त असते. बाटलीची स्वच्छता न राखल्यास जंतूसंसर्गाचा धोका देखील वाढतो.
5) सहा महिन्यांच्या आधी वरचा आहार सुरू : अनेक घरांमध्ये बाळ 3-4 महिन्याचे होताच वरचे अन्न द्यायला सुरुवात केली जाते. या काळात बाळाची पचनशक्ती कमकुवत असते. त्यामुळे वरचे अन्न खाऊन बाळाला अतिसार, जंतुसंसर्ग होऊ शकतो. हे टाळण्यासाठी बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत थांबायला हवे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)