जीवन पोषण (भाग १)

डॉ. तेजस लिमये, आहारतज्ज्ञ 
दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून साजरा केला जातो. यावर्षीपासून संपूर्ण सप्टेंबर महिना “राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून साजरा केला जावा आणि या काळात भारतातील कुपोषण दूर करण्यासाठी जनजागृती केली जावी, असे नुकतेच केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाकडून जाहीर करण्यात आले. यावर्षीसाठीचा विषय आहे जीवनातील पहिल्या 1000 दिवसांमधील पोषण. 
जीवनातील पहिले 1000 दिवस म्हणजे गर्भधारणा झाल्यापासून ते बाळाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंतचा काळ! गर्भारपणाचे साधारण 270 दिवस (9 महिने) + पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील 730 दिवस (365 + 365)! या 1000 दिवसांचे आपण पुढील तीन विभाग करू – गर्भारपण, केवळ स्तनपानाचा काळ व स्तनपानाबरोबरीने वरचा आहार देण्याचा काळ. या तीनही टप्प्यांमधील आहाराबाबत समाजामध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. काही गैरसमजांपोटी अथवा अज्ञानापोटी आहारविषयक अनेक चुकीच्या पद्धती सर्वत्र पहायला मिळतात. अशा काही नेहमी केल्या जाणाऱ्या चुका आणि त्यामागील तथ्य आपण आता पाहूया…
अ) गर्भारपण (0 – 9 महिने)
1) गर्भारपण म्हणजे दोघांसाठी खाणे : एका प्रौढ स्त्रीचा जेवढा आहार असतो तेवढा अतिरिक्त आहार 3 किलो वजनाच्या बाळासाठी कसा लागेल? त्यामुळे गरोदरपणात दोघांसाठी खाणे ही समजूत चुकीची आहे. गरोदरपणात उष्मांकाची गरज साधारणपणे 20% ने वाढते; पण ती देखील विशेष करून शेवटच्या 3-4 महिन्यांमध्ये. उष्मांकांबरोबरच गरोदरपणात प्रथिने, लोह, कॅल्शिअम व जीवनसत्वांची वाढलेली गरज भागवणे महत्वाचे असते. यासाठी “किती’ खायचे यापेक्षा “काय’ खायचे ते महत्वाचे!
2) गर्भारपणात अतिरिक्त तूप-लोणी व गोडाचे पदार्थ मर्यादेतच खावेत :
गरोदरपणाची चाहूल लागली की गर्भवती महिलेचे घरोघरी लाड सुरु होतात. आपल्याकडे प्रेम व्यक्त करायची आणि लाड करण्याची नेहमीची पद्धत म्हणजे गोडाधोडाचे खाऊ घालणे! शिवाय गरोदरपण म्हणजे फक्त आईचेच नाही, तर बाळाचेही लाड असतात! तूप खाऊन बाळ धष्टपुष्ट होईल, डिलीव्हरी नॉर्मल होईल अशा गैरसमजातून गरोदरपणात खूप जास्त (दिवसभरात अगदी 8-10 चमचे सुद्धा) तूप घेतले जाते. इतके तूप आणि गोडाधोडाचे पदार्थ खाऊन आई आणि बाळ दोघांचेही वजन अतिरिक्त प्रमाणात वाढण्याची शक्‍यता असते. असे झाल्यास नॉर्मल डिलीव्हरीची शक्‍यता कमी होते.
3) गर्भारपणात बाहेरचे/पॅकेटबंद खाद्यपदार्थ खाणे टाळावे:
गरोदरपणात डोहाळ्यांच्या नावाखाली बाहेरचे चटक – मटक पदार्थ (चाट), चॉकोलेट्‌स, चिप्स यावर अनेकजणी आडवा हात मारताना दिसतात! यामुळे नको तितक्‍या प्रमाणात वजनवाढीची शक्‍यता तर असतेच शिवाय बाहेरचे न शिजवलेले अन्न खाऊन (चाट) पोट बिघडण्याची शक्‍यता असते. चिप्स व इतर पॅकेटबंद पदार्थांमधील अतिरिक्त मिठामुळे गरोदरपणात रक्तदाब वाढण्याची शक्‍यता असते. चायनिज पदार्थांमधील अजिनोमोटो, कृत्रिम खाद्यरंग चॉकोलेट्‌समधील साखर, कॅफेन बाळासाठी हानिकारक ठरू शकतात.
4) आहारातील मांसाहारी पदार्थांचे सेवन बंद करावे का? अनेक गर्भवती महिला गरोदरपणात मांसाहारी पदार्थांचे सेवन पूर्ण बंद करतात. खरंतर मांसाहारी पदार्थांमधून चांगल्या प्रतीची प्रथिने मिळतात जी बाळाच्या वाढीसाठी आवश्‍यक असतात. मांसाहारी महिलांनी गरोदरपणात घरी बनविलेल्या मांसाहारी पदार्थांचे (अंडी, चिकन, गोड्या पाण्यातले मासे) थोड्या प्रमाणात पण नियमितपणे सेवन करण्यास हरकत नाही. शाकाहारींनी उत्तम दर्चाच्या प्रथिनांसाठी दूध-दही-चीज-पनीर यांचा आहारात समावेश करावा.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)