जीवनावश्‍यक वस्तूंवर जीएसटी कशाला?

चाकण-“जीएसटी’तील जाचक त्रुटी, तसेच जीवनावश्‍यक वस्तूंवर व्हॅट नसतानाही “जीएसटी’ लागू केला जात असल्याच्या निषेधार्थ चाकण येथील व्यापार-उद्योगांच्या वतीने आज सोमवारी (दि. 19) पुकारलेल्या एक दिवसाचा बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. या बंदमध्ये चाकण शहर व्यापारी महासंघातील तब्बल वीस संघटना सहभागी झाल्या होत्या. व्यापारी संघटनांच्या वतीने तहसीलदार व खेडच्या लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले.
सायंकाळी येथील मीरा मंगल कार्यालयात चाकण शहर व्यापारी महासंघाचा मेळावा झाला. त्यात “जीएसटी’ अंमलबजावणीला अवघे काही दिवस राहिले असताना या करप्रणालीत अनेक त्रुटी असल्याकडे सर्वांनी लक्ष वेधले. यापूर्वी केंद्र सरकारने ज्या वस्तूंवर व्हॅट नाही अशा वस्तूंवर “जीएसटी’ लागू करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले होते; पण प्रत्यक्षात काही वस्तूंवर पाच, तर काही वस्तूंवर 28 टक्के कर लावण्यात आला आहे. विवरणपत्रांची संख्या कमी करून ती सुटसुटीत करावी, व्यवसाय कर व बाजार समिती सेस रद्द करावा, मालवाहतुकीसाठी ई-बिलची प्रक्रिया सुटसुटीत करावी. अन्नधान्य उद्योगांचा जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये समावेश करण्यात आला आहे; पण या वस्तूंवरही पाच टक्के “जीएसटी’ लावण्यात आला आहे. खाद्यपदार्थ वगळण्यात आल्याचे जाहीर केले; पण ब्रॅंडेड वस्तूंच्या नावाखाली लावलेला कर रद्द करावा. “जीएसटी’ नोंदणी करताना अनेक त्रुटी आहेत, त्यामुळे किमान एक वर्षासाठी व्यापार्यांना कोणताही दंड करू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा सरकारने सकारात्मक विचार करावा अशी एकमुखी मागणी चाकण व्यापारी महासंघाकडून या मेळाव्यात करण्यात आली. या मेळाव्यास व्यापारी महासंघाचे ध्रुव कानपिळे, किरण मांजरे, अशोक सांकला, संदीप परदेशी, संजय ओसवाल, विष्णू कड, मच्छिंद्र गोरे, मोहन वाडेकर, प्रकाश खळदकर, दीपक कर्नावट, प्रशांत बागडे, आदींसह शेकडो व्यापारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)