जीवनानंदाची सोपी सूत्रे

 कथाबोध

डॉ. न. म. जोशी

एका गावात एक सत्पुरुष राहात होते. त्यांच्याकडं सत्संगासाठी अनेक लोक येत. ते सर्वांना मोकळेपणाने मार्गदर्शन करीत. ते वैद्य नव्हते. पण प्रकृती किंवा आजार याबाबतही त्यांचं मार्गदर्शन लोकांना उपयोगी ठरत होते. गावात एक गर्भश्रीमंत बडे व्यापारी होते. बक्कळ पैसा, उंची हवेली, नोकरचाकर सगळा थाट होता. पण शेठजींना रात्री शांत झोप लागत नव्हती. कितीतरी वेळ अंथरुणावर, या कुशीवरून त्या कुशीवर करीत त्यांची पत्नी खूप काळजीत पडली. तिनं या सत्पुरुषाचा लौकिक ऐकला होता. ते चांगलं औषध देऊन आपल्या नवऱ्याला बरं करतील असा तिला विश्‍वास होता. दोघे पतीपत्नी सत्पुरुषांकडं आले. आणि त्यांनी आपली वेदना सांगितली. म्हणाले,
“महाराज आपण माझी नाडी परीक्षा करावी. औषध सुचवावे.’
“मी तुमची नाडीपरीक्षा केलीय,’ सत्पुरुष म्हणाले.

“नाडी न बघताच नाडीपरीक्षा? ती कशी काय?’ शेठजी आश्‍चर्यानं म्हणाले.
“तुमच्या शरीराची नाही तर मनाची नाडीपरीक्षा मी केलीय. मी तुम्हाला कुठलंच औषध देणार नाही. फक्त चार नियम सांगणार आहे. ते पाळा म्हणजे झाले.’
“सांगा नियम. मी ते तंतोतंत पाळीन.’

“पहिला नियम… तुम्ही आता जेवढं अन्न ग्रहण दिवसात करता त्याच्या निम्मंच खा.’
“बरं. प्रयत्न करीन. दुसरा नियम?’
“तुम्ही आता जेवढं चालता त्याच्या दुप्पट चाला आणि तेही भरभर.’
“प्रयत्न करतो. तिसरा नियम?’

“तुमच्या धंद्याच्या व्यापामुळे तुम्हाला हसायला वेळ कमी मिळतो. चौपट हसा. मोकळेपणाने हसा.’
“बरं हसेन. चौथा नियम?’
“मोजदाद न करता सर्वांवर अखंड प्रेम करा. थोडक्‍यात सांगतो- निम्मं खा, दुप्पट चाला, चौपट हसा आणि न मोजता प्रेम करा.’
शेठजींनी सत्पुरुषांच्या नियमांचं तंतोतंत पालन केलं. त्यांना शांत झोप लागू लागली. जीवनानंदाची ही सोपी सूत्रे त्यांनी मग इतरांनाही सांगितली.

       कथाबोध

आजच्या चंगळवादी स्पर्धात्मक युगात माणसाची जीवनशेलीच वाढलेली आहे. माणसं वेळी अवेळी कारण नसताना, भूक नसताना, जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खात सुटतात. मग आजाराला आमंत्रण मिळतं. बैठी काम, गाडीतून हिंडणं त्यामुळो चाललं नाही व्यायाम नाही. शरीराच्या नसा मग गंजून जातात. त्यावरील काजळी झटकायची असेल व्यायाम हवा, हालचाल हवी. आजच्या युगात माणसाचं हसणंही कमी झालंय एकतर संवादच कमी झाला. मग मोकळ्या गप्पा कुठल्या? असतात त्या बिझिनेस मिटींग. नातेवाईकही प्रसंगोपात्रच भेटतात. मग कृत्रिमरीत्या हास्यक्‍लबमध्ये जाऊन माणसं हसतात आणि प्रेम? प्रेमसुद्धा मोजूनमापून करतात.

एकमेकांवर प्रेम करणाऱ्या प्रेमिकांचे विवाह आर्थिक कारणांमुळे किंवा करियरमुळं मोडलेले आपण ऐकतो तेव्हा प्रेमासारख्या पवित्र भावनेलाही आपण स्पर्धेच्या दुकानात मांडून ठेवत असतो. मग सुख कसं लागावं? त्यासाठी उपरोक्त सत्पुरुषांची सोपी सूत्रे उपयोगी आहेत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)