जीवनातील सर्वात संस्मरणीय क्षण- दिनेश कार्तिक 

निदहास तिरंगी टी-20 मालिका : कारकिर्दीतील सर्वोत्तम काळ 

कोलंबो: दिनेश कार्तिक हा काही जोगिंदर सिंग किंवा हृषिकेश कानिटकर नव्हे आणि ते स्वत: दिनेश कार्तिकलाही मान्य आहे. परंतु निदहास तिरंगी टी-20 मालिकेतील बांगला देशविरुद्धच्या अंतिम सामन्यात अखेरच्या चेंडूवर षटकार लगावून भारताला विजेतेपद मिळवून देण्याचा क्षण आपल्या जीवनातील सर्वाधिक संस्मरणीय क्षण असल्याचा आनंद आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे मात्र त्याला मनापासून वाटते.
जोगिंदर सिंग आणि हृषिकेश कानिटकर या दोघांनीही त्या त्या काळात अत्यंत महत्त्वाच्या सामन्यांमधील अखेरच्या चेंडूवर नेत्रदीपक कामगिरी बजावताना भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिले होते. कानिटकरने बांगला देशमधील बंगबंधू स्टेडियमवर अंधुक प्रकाशात अखेरच्या चेंडूवर चौकार लगावून भारताला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला होता. तर जोगिंदर सिंगने पहिल्यावहिल्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानचा अखेरचा फलंदाज बाद करून भारताला जगज्जेतेपद मिळवून दिले होते.
जोगिंदर किंवा कानिटकर या दोघांच्या त्या सामन्यांमधील कामगिरीशी कार्तिकच्या कामगिरीची तुलना होऊ शकणार नाही. तरीही कार्तिकची एकंदर कामगिरी जोगिंदर किंवा कानिटकर यांच्यापेक्षा खूपच सरस आहे. किंबहुना गेल्या सुमारे साडेतेरा वर्षांच्या कालावधीत भारतीय संघात अधूनमधून समावेश झालेल्या दिनेश कार्तिकने भारतीय संघासाठी अनेकदा बहुमोल कामगिरी बजावली आहे. मात्र एखाद्या क्रिकेटपटूला इतिहासात अजरामर करणारा क्षण त्याच्या कारकिर्दीत आला नव्हता. निदहास तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्याने ही उणीव भरून काढली असे म्हणावे लागेल.
नियोजनबद्ध प्रयत्नांचे फलित 
दिनेश कार्तिकच्या अखेरच्या चेंडूवरील षटकारामुळे जावेद मियॉंदादने भारताविरुद्ध चेतन शर्माला लगावलेल्या षटकाराच्या स्मृती जाग्या केल्या. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची गरज असताना सौम्य सरकारच्या सहाव्या चेंडूवर एक्‍स्ट्रॉ कव्हरला षटकार लगावताना कार्तिकने भारताला मिळवून दिलेला विजय इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळवून जाईल यात शंका नाही. आपण केलेली ही कमाल म्हणजे चमत्कार नसून गेल्या एक-दीड वर्षापासून सुरू असलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगताना कार्तिकने नवोदित खेळाडूंना संदेशच दिला. गोलंदाजाच्या शैलीवरून तो टाकणार असलेल्या चेंडूचा अंदाज घेऊन मी फटक्‍यासाठी स्वत:ला “पोझिशन’ करीत होतो, असे सांगून कार्तिक म्हणाला की, प्रत्येक चेंडूवर चौकार किंवा षटकार लगावण्याचा निर्धार मी केला होता आणि त्यातूनच “तो’ षटकार साकारला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)