जीवनशैली बदललेली…

वाड्यातल्या सार्वजनिक नळावर धुण्याच्या किंवा पाणी भरण्याच्या निमित्ताने शेजारणींशी दोन गप्पा व्हायच्या त्यात अगदी मंडईत भाजी महागल्यापासून ते थेट काल रात्री बाळू का हो जोराने रडत होता इतपर्यंत विषय असायचे, आणि बाळूविषयी विचारलेलंही शेजारणीला आवडायचं. पण घरात नळ, घरात बाथरूम आणि घराचं दार लावलेलं, बंद, यामुळे दुपारच्या गप्पा सगळ्यांनी मिळून एकत्र भाजी नाही तर धान्य निवडणं आपले बारीक-सारीक कार्यक्रम शेजारणीला सांगणं, घरी येणारे पाहुणे, नातेवाईकांविषयी न आवडलेली गोष्ट, वाड्यातल्या मंगळागौरी, एखाद्या नवविवाहितेची अपत्य जन्माची चाहूल इथपर्यंतच्या गोष्टी या गप्पांमधून प्रत्येकीला कळायच्या ते बंद झालं.

हळदी कुंकवाऐवजी भिशी करायला बायकांना आवडू लागलं, केक कापून बर्थ डे करायला आवडू लागलं, भेटण्यासाठीही हीच निमित्त होऊ लागली, त्यातल्या गप्पा टीव्ही सिरियलमधील पात्रांविषयीच्या नाहीतर नव्यानेच इंग्लिश मीडियम शाळेत जाऊ लागलेल्या मुलांच्या अभ्यासाविषयी होऊ लागल्या. मुला-मुलींच्या नोकऱ्यांचं कौतुकही व्हायला लागलं. शेजारणीच्या घरी जायला दुपारची वेळ अयोग्य वाटू लागली आणि पूर्वी शेजाऱ्यांच्या आणि आपल्या पेपरची अदलाबदल करून वाचले जायचे. पण आता मात्र पेपर मागणं “मॅनरलेस’ वाटू लागलं.

नातेवाईकांना केळवण, डोहाळे जेवण करताना “श्रेयस’मध्ये करणं हे “स्टेटस सिम्बॉल’ वाटू लागलं. गृहिणींना एकत्र जमण्यासाठी सोसायटीची मीटिंग हे ठिकाण नव्यानं मिळालं. वाडा संस्कृतीत सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे मुलांनीच सगळं करायचं असं ठरलेलंच असायचं. पण फ्लॅट कल्चरमध्ये आल्यावर मात्र त्याला खास महत्त्व आलं आणि ठरल्याप्रमाणे तीन वर्षांनतर त्यातल्या स्पर्धा, रुसवेफुगवे यांची हौस फिटून तो बंदही होऊ लागला. कोजागिरी पौर्णिमेचंही तेच! कारण फ्लॅटमध्ये आल्यावर मानसिकतेतही बदल झाला हे त्यांच्या स्वतःच्याही लक्षात आलं नाही.

पूर्वी घरात साडी नेसणं आदर्श वाटायचं तर फ्लॅटमध्ये गाऊन सुटसुटीत वाटायला लागला. मुलीचं पॅंट घालणं, मुलाचं एम टीव्ही पाहणं “स्टॅंडर्ड’ सुधारल्याचं लक्षण वाटू लागलं. “आमच्या मुलांना नॉन-व्हेजच जास्त आवडतं.’ हे आई-वडील अभिमानानं सांगू लागले, जे पूर्वी अंडही लपवून आणत असत.

फक्त रविवारी सकाळी बाहेरचे पॅटीस हा नाश्‍ता असायचा, बाकी दिवशी फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात असायचा. आता मात्र रोज सकाळी पोहे, उप्पीट, थालीपीठ असा नाश्‍ता लागतो. वाड्यातल्या लग्नकार्यात एकत्र आहेर देण्याची पद्धत नकोशी वाटू लागली. पै-पाहुण्यांसकट जेवायला या असं आमंत्रण मागे पडलं.

व्यायामासाठी योगा, बॅडमिंटन, मॉर्निंग वॉक आवडू लागला जी पूर्वी फॅड वाटायची. गुढी पाडव्याच्या गुढ्याही तुरळक झाल्या ज्यांच्या वरचे रंगीबेंरगी खण बघणं हे खूप प्रसन्न वाटायचं. वाड्यात असताना एकमेकांकडे दिवाळीत फराळाची ताटं जायची, आता मात्र बहुतेक सगळ्यांच्याकडे विकत फराळाचं येऊ लागला. त्यामुळे सगळ्याची चव सारखीच. दिवाळीतल्या पणत्या, आकाशकंदीलही कमी झाले.

याशिवाय वाड्यातल्या घरात फर्निचर हा शब्द सुद्धा वापरायला बिचकायचं, कारण घरात असणार काय तर एक पलंग किंवा कॉट आणि लाकडी खुर्च्या त्या जड आणि जास्त जागा लागणाऱ्या असायच्या. एकुलत्या एक आरामखुर्चीवर फक्त आजोबांचाच हक्क असायचा. वाड्यात अंगण असेल तर त्यात ती खुर्ची घालून आजोबा हमखास उन्हाळ्याच्या दिवसात आराम करत बसायचे. घरात एकच कपाट तेही बहुधा लाकडी आणि त्यातच सगळ्यांचे कपडे मावायचे बरं का! बहुसंख्य घरात डायनिंग टेबलं नसायचीच कारण जमिनीवर बसून जेवणं हे आरोग्यदायी समजलं जायचं.

यात पहिला बदल बहुदा खुर्च्यांमध्ये आला लाकडी खुर्च्यांच्या घड्या घालून ठेवता येत नसल्याने पत्र्याच्या घडीच्या खुर्च्या लोकप्रिय झाल्या. त्यात स्थानिक आणि गोदरेजसारखी ब्रॅंडेड प्रॉडक्‍ट आली. एखाद्या घरात डायनिंग टेबल असलं तर त्याचा रायटिंग टेबल सारखाही उपयोग केला जायचा पण वाड्यांचे फ्लॅट झाल्यावर स्वयंपाकघर स्वतंत्र झालं त्यामुळे डायनिंग टेबलालाही जागा मिळाली. हाताच्या खुर्च्या कम्फर्टेबल वाटायला लागल्या. पण त्यातही तेच तेच रंग आल्यानं मागे पडल्या, कॉमन झाल्या. शिवाय खुर्चीच्या पायाचं रबर गेलं की खुर्ची पडायची भीती, पुढे पुढे लोक नायलॉनच्या खुर्च्या, फोमच्या खुर्च्या सुद्धा वापरू लागले.

बाजारात नवीन काही यायला लागलं आणि पुणेकर चोखंदळ होऊ लागले. यात नायलॉनने विणलेले किंवा लेदरचे सोफसेट आले तेही “श्रीमंती’ दिसावं म्हणून लोक वापरू लागले. शिवाय सोफा कम बेड हा प्रकार आल्याने दोन्हीची सोय झाली, हे जरा अवजड वाटू लागलं असता दिवाण आला त्यात छोटा, मोठा, मध्यम आले आणि भाव खाऊन गेले. त्यात कपडे ठेवण्याची सोय असलेलेही मिळू लागले.

गावातल्या घरांमध्ये टेरेसची सोय करणं, गॅलरीत कुंड्या ठेवणं हे शक्‍य नव्हतं, कारण गॅलरीचा उपयोगच खोलीसारखाच करावा लागायचा तर टेरेस कुठला. पण यातही बदल झाला. गावातली जागा लहान वाटू लागली कारण मुलांचं पुढचं शिक्षण, लग्न यासाठी हे अपुरं वाटू लागलं, मग उपनगरांची निवड राहण्यासाठी केली जाऊ लागली. तिथे राहायला खरंच मोकळ्या ढाकळ्या जागा मिळू लागल्या, बाल्कनीचा उपयोग संध्याकाळी निवांत बसून शांतपणे चहा पिण्यासाठी होऊ लागला, त्यावेळी लाकडाचे “मोडा’ लोकप्रिय झाले. त्याचा उपयोग टेरेसवर उन्हाळ्यात हवा खात गप्पांची मैफल रंगवण्यातही होऊ लागला, तिथे चार कुंड्या आल्या.

वाड्यात असताना नाही पण उपनगरात राहायला गेल्यावर भारतीय बैठक हे रसिकतेचे प्रतीक मानून बैठकीत सर्रास विराजमान होऊ लागली. नवी घरं, मोठी घरं यामुळे मनंही बदलली म्हणजे घर अगदी स्वच्छ, नीटनेटके ठेवण्याकडे कल अधिक वाढला, रंगसंगीताचा विचार अधिक होऊ लागला. घरात अँटिक पीसेस आले, ते आवडू लागले. इतकंच नाही तर लॅंडलाईनचे वेगवेगळ्या रंगाचे फोन आले आणि तेही लोकप्रिय झाले. किचन ओट्याचा आकार वाढला अलीकडे तर मोठा किचन ओटा त्याच्या खाली किचन ट्रॉली आणि त्यात डबे, पातेली इतर भांडी आत मावतात त्यामुळे भांड्यांचा पसाराही संपला.

– डॉ. नीलम ताटके

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)