जीवनगाणे: स्वत:कडे पाहा

अरुण गोखले

दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसतं, स्वत:च्या डोळ्यातले मुसळ मात्र दिसतं नाही, अशी आपल्याकडे जी एक म्हण आहे ना ती काही खोटी नाही. कारण माणसाचं नेहमी असचं आहे. त्याला इतरांचे दोष चटकन दिसतात. तो दुसऱ्याला अगदी सहजपणे नावे ठेवतो. पण त्याला स्वत:कडे मात्र पाहता येत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खरं तर पाहता येतं पण पाहायचे नसतं. त्याला स्वत:च्या दोषांकडे डोळेझाक करण्यात आणि दुसरी व्यक्‍त कशी दोषी आहे. तो कसा अपराधी आहे. त्याने कशा चुका केल्या आहेत. त्याचे वर्तन कसे गैर आहे, हे जगाला सांगत फिरण्यात एक आसुरी आनंद आणि समाधान मिळत असते.

अशा व्यक्‍तीला साधू, संत, सत्पुरुष किंवा त्याचे सद्‌गुरू हे असा सल्ला देतात की “”बाबारे! हे असं दुसऱ्याचे दोष पाहून, त्याच्याकडे बोटे दाखवताना, तो असा आहे, तो तसा आहे, हे म्हणताना त्याची निंदानालस्ती करताना तू कधी स्वत:कडे पाहिले आहेस का? नसलं पाहिलेस तर एकदा डोळे नीट उघडून पाहा. तसं पाहिलेस ना की मग तुझं तुलाच कळेल की दुसऱ्याकडे अशी बोटे दाखवत असताना त्यातली किती बोटे तुझ्या स्वत:कडे वळलेली आहेत!

तू इतरांना दोषी ठरवत असताना त्यांचे दोष उघड करत असताना याचाही विचार कर ना की तू स्वत: कसा आहेस? तो खोटे बोलतो, खोटपणाने वागतो, त्याला शिष्टाचार कळत नाहीत, त्याच्या तोंडी सभ्यभाषा नाही, तो सुसंस्कृतपणे वागत नाही. हे आणि असे म्हणताना तू स्वत: किती खोटे बोलतोस, किती खरेपणाने वागतोस, तू किती शिष्टाचार पाळतोस, तू किती सुसंस्कृतपणे आचारविचार करतोस याचा विचार कर ना?

ती येशूची गोष्ट तुला माहीत आहे ना? एका स्त्रीला ती कुलटा आहे, पापी आहे, म्हणून सर्वजण दगडाने मारत असतात. येशू त्या लोकांना म्हणतो की, ज्याच्या मनात पाप नाही, ज्याच्या आचारविचारात खोट नाही, त्यानेच दगड उचला… पण येशूचे ते बोलणे ऐकल्यावर आणि स्वत: स्वत:चा विचार करायला लागल्यावर मात्र एकही हात दगड उचलायला पुढे येत नाही.’
हे असंच आहे. बोलायला सगळ्या गोष्टी सोप्या असतात. त्या आचरणात आणायच्या म्हटल्या की मगच खरेपणाची नेमकी कसोटी लागत असते. तेव्हा दुसऱ्याच्या आधी स्वत:कडे नीट पाहा, स्वत:चे आत्मपरीक्षण करा आणि मग दुसऱ्यांचे दोष दाखवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)