जीवनगाणे : गोड बोला…

अरुण गोखले

संक्रांतीचा सण आपल्या जीवनात नववर्षाची एक गोड सुरूवात करुन देणारा दिवस असतो. त्या दिवशी लहान मोठ्यांनी, अबाल वृद्धांनी, एकमेकांच्या हातावर तिळगुळाची वडी, पांढरा शुभ्र/विविध रंगी काटेरी हलवा देत तिळगूळ घ्या गोड बोला असं सांगत असतात. तो गोड सांगावा एकमेकांना द्यायचा घ्यायचा असतो आणि पुढे प्रत्यक्ष आचरणात आणून त्या संदेशाचे पालन करायचे असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूर्वी संक्रात आली की, पोष्टाने घरोघर हलव्याच्या छोट्या पिशव्या आणि त्या सोबतच संक्रांत भेटकार्ड यायचे. त्या भेटकार्डावर सोबतच्या गोड तिळगुळाप्रमाणेच एखादा गोड संदेशही असायचा. तो संदेश घेऊन आलेली ती हलव्याची पिशवी पाहणे आणि सोबतच्या भेटकार्डावरचा संदेश वाचणे ह्याच एक आगळ वेगळच अप्रूप असायचे. अशाच एका संक्रांतीच्या भेटकार्डावर काही वर्षापूर्वी वाचलेल्या चार ओळी मला अजून आठवतात. त्या चार ओळी अशा होत्या…

शब्दाशब्दावरती सुंदर,
माधुर्याचा पाक चढवूया
भावाच्या मंदाग्निवरती,
हलक्‍या हाते शब्द घोळूया।।
शुद्धवाणीच्या वाटीमधूनी,
शब्दांचा तिळगुळ लुटवूया
मधु बोला रे मधु बोला रे,
ज्याला त्याला चला सांगूया।।

खरचं किती सार्थ आणि अर्थपूर्ण ह्या ओळी, जणू त्या संक्रांतीच्या सणाचं मोलच सांगून जाणाऱ्या. कारण गोड बोला ह्या संदेशाला आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात फार महत्वाचे स्थान आहे. वाणी हे माणसाला मिळालेले वरदान आहे. माणूस या शब्दांच्या माध्यमातूनच त्याच्या भावभावना समोरच्या व्यक्तीपर्यन्त प्रभावीपणे पोहचवू शकतो. आपल्या मनातले भाव सांगू शकतो. त्यासाठीच माणसाने उच्चारलेला शब्द हा कसा असावा तर –

शब्द असावा फुलासारखा,
जो दुसऱ्याच्या मनी वसावा।
शब्द नसावा काट्यापरी तो,
जो दुसऱ्याच्या मनी रुतावा।।

शब्दांनीच माणसांची मने जोडली जातात आणि त्या शब्दांच्या भरवश्‍यावरच मानवी जीवनाची उभारणी होत असते. त्यामुळेच तो शब्द हा जीवनात माणसे जोडत जाणारा असावा.माता पित्यांचा शब्द, पति पत्नीचा शब्द, मित्राचा/मैत्रिणीचा शब्द, गुरूंचा शब्द.

या प्रत्येक शब्दांना आणि त्यावरच्या विश्‍वासाला माणसाच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात फार महत्व असते. परस्परातील विश्‍वासाच्या भरभक्कम पायावरच आपली नाती आणि नातेसंबंध उभे राहतात. एकमेकांना दिलेल्या शब्दांना आणि त्याच्या काटेकोर पालनाला फार महत्व असते. दिलेला शब्द पाळणारी व्यक्ती ही विश्‍वास प्रात्र ठरते. त्यामुळेच शब्दाचे मोल लक्षात घेऊनच हा गोड बोलाचा संदेश आपण एकमेकांना द्यायला घ्यायला हवा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)