जीवंत देखाव्यातून उलगडली ‘वर्दीतील माणसाची’ व्यथा

पुणे  – निवडणूका, गणेश विसर्जन मिरवणूक किंवा एखादे संकट ओढावले तरी खंबीरपणे नागरिकांच्या पाठिशी उभे राहतात, ते पोलीस. पोलिसांनाही स्वत:चे कुटुंब असते, स्वाभिमान असतो, परंतु आजच्या काळातील घटना पाहता पोलिसांवर देखील हल्ले होवू लागले आहेत. इतरांचे रक्षण करताना मुंबईतील 26-11 च्या हल्ल्यामध्ये वेळप्रसंगी आपला जीव गमवावा लागलेल्या पोलिसांनी दाद मागायची कुठे, अशा पोलिसांच्या मनातील विविध प्रश्न आणि अडचणींना वाट करुन देत जीवंत देखाव्यातून वर्दीतील या माणसाची व्यथा मांडण्यात आली.
रविवार पेठेतील श्री अखिल कापडगंज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने वर्दीतील माणूस या जीवंत देखाव्याचा शुभारंभ झाला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, हरिश खंडेलवाल, गोविंद तिवारी, गणेश बानगुडे, आतिष जांगडे, दिनेश खंडेलवाल, किसन पवार आदी उपस्थित होते. लेखक व दिग्दर्शक मनिष शिंदे यांच्या ग्रुपमधील कलाकारांनी हा जीवंत देखावा सादर केला आहे.
संदीप जोशी म्हणाले, पोलिसांचे वैयक्तिक आयुष्य, वाहतूक नियोजन करताना उद्‌भविणाऱ्या समस्या, गणेश विसर्जन मिरवणुकीचा ताण, पोलिसांवर होणारे हल्ले आणि 26-11 सारख्या संकटांमध्ये खंबीरपणे भूमिका बजावणाऱ्या पोलिसांच्या व्यथा मांडण्यासोबतच त्यांना सलाम करण्याकरीता या देखाव्याचे आयोजन करण्यात आले. देखाव्यामध्ये 7 कलाकार असून प्रत्येकी 11 मिनीटांचे दररोज 10 प्रयोग सादर होणार आहेत. गुन्हेगारांची संख्या पोलिसांपेक्षा दुप्पट-तिप्पट असून पोलिसांकडे अद्ययावत शस्त्रे देखील नसतात. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधत जनजागृती करण्याचा प्रयत्न देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)