जीएसटी मंजुरीमुळे ‘मातोश्री’ला काय मिळणार?

दिलीप वळसे-पाटील यांचा खोचक टोला
मुंबई: वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीवरुन सध्या विशेष अधिवेशन भरवण्यात आले आहे. विधानभवनात जीएसटीवर चर्चा सुरु आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटीचा प्रस्ताव सभागृहासमोर मांडला. मात्र विरोधकांनी जीएसटीमधील त्रुटींवर बोट ठेवले. तसेच यावर एकच गोंधळही करण्यात आला.
जीएसटीच्या मंजुरीसाठी दिल्लीत नेमके काय घडले आणि मातोश्रीला काय मिळणार हे आम्हालाही सांगा असा खोचक टोला यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मुनगंटीवारांना मारला. जीएसटीला हिरवा कंदील मिळावा यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी मातोश्री वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. दुसरीकडे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जीएसटीबरोबर शेतकरी कर्जमाफीवरही चर्चा करावी अशी मागणी केली. जीएसटी ज्याप्रमाणे महत्त्वाचे आहे, त्याप्रमाणे शेतकरी कर्जमाफीही महत्त्वाची आहे, असे विखे पाटील म्हणाले. दरम्यान, यासर्व गोंधळात जीएसटीवर चर्चा होवून मंजूरी मिळवण्यासाठी सरकारकडून कसोशीने प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी जीएसटीसोबतच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचाही मुद्दा उचलून धरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)