जीएसटी घोटाळा : चित्रपट दिग्दर्शक विजय गुट्टे यांना अटक

14 ऑगस्टपर्यंत आर्थर रोड कारागृहात रवानगी
मुंबई – अनुपम खेर यांच्या आगामी “द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे. 34 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी जीएसटीच्या इंटेलिजन्स विंगने त्यांना बेड्या ठोकल्या. विजय गुट्टे यांना जीएसटी कायद्याच्या कलम 132 (1) (क) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

विजय गुट्टे तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचे सांगितले जात आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी 14 ऑगस्टपर्यंत आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे.

-Ads-

मिळालेल्या माहितीनुसार, विजय यांची व्हीआरजी डिजिटल कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीने होरायझन आऊटसोर्स सॉल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून ऍनिमेशन आणि मॅनपॉवर सर्व्हिससाठी 34 कोटी रुपयांच्या जीएसटीची 149 खोटी बीले घेतल्याचा आरोप आहे. महत्त्वाची बाब म्हणजे विजय यांनी या कंपनीकडून कोणतीही सेवा घेतली नव्हती.

यापूर्वीच होरायझन नावाच्या या कंपनीविरोधात 170 कोटी रुपयांच्या खोट्या जीएसटी बिलाचा खटला सुरु आहे. याप्रकरणी कंपनीच्या संचालकांना अटक करण्यात आलेली आहे.

दिग्दर्शक म्हणून “द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा विजय गुट्टेंचा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे माजी मीडिया सल्लागार संजय बारु यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात मनमोहन सिंग यांची भूमिका अनुपम खेर साकारत आहेत. तर संजय बारु यांच्या भूमिकेत अक्षय खन्ना आणि दिव्या सेठ शाहर या मनमोहन सिंह यांच्या पत्नी गुरशरण कौर यांच्या भूमिकेत झळकणार आहेत.

दरम्यान, विजय गुट्टे हे रत्नाकर गुट्टे यांचे पुत्र आहेत. रत्नाकर गुट्टे यांच्यावरही 5500 कोटींच्या बॅंक घोटाळ्याचा आरोप आहे. त्यांनी परभणीतील गंगाखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. रत्नाकर गुट्टेंवर घोटाळ्याचा आरोप करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांना महाराष्ट्राचा “छोटा मोदी’ असल्याचे म्हटले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)