जीएसटीमुळे लघु उद्योग क्षेत्राचाही विकास – पियूष गोयल

उत्पादन आणि सेवेच्या गुणवत्तेवर आधारित स्पर्धा वाढेल

मुंबई – जीएसटीमुळे उत्पादन आणि सेवेच्या गुणवत्तेवर आधारित स्पर्धा वाढेल. तसेच समाजातील विविध घटकांच्या सहभागामुळे लघु उद्योग क्षेत्राचाही विकास होईल, असे ऊर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पियूष गोयल यांनी म्हटले आहे.

मुंबईत लघु उद्योग भारती, महाराष्ट्र प्रदेश आयोजित लघु उद्योजकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. या उद्‌घाटन सत्राला लघु उद्योग भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश मित्तल, राष्ट्रीय उपाध्यक्ष भूषण वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.

पियूष गोयल म्हणाले, अशा परिसंवादांमधूनच राष्ट्र विकासाचे नवे मुद्दे समोर येतील. स्वत:चे भांडवल न वापरता बॅंकांकडून पैसे घेऊन उद्योग उभारण्याची मानसिकता यापूर्वी देशात रुजली होती. त्यामुळेच आज बॅंका डबघाईला आल्या आहेत. पंतप्रधानांनी पहिल्यांदाच बॅंकांना जबाबदार बनवण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.

यामुळे इमानदार लघु उद्योजकांना लाभ होईल. वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे खरेदी-विक्रीची संपूर्ण माहिती आपोआप पटलावर येणार असल्यामुळे चौकशीचा ससेमिरा वाचेल. तसेच व्यापाऱ्यांना केवळ एकच सेल्स रजिस्टर ठेवायचे आहे. त्यामुळे प्रामाणिक उद्योजकांनी चिंता करू नये, असे ते म्हणाले.

गरीब, शेतकरी, महिला तसेच सामान्य नागरिकांच्या गरजेच्या वस्तू लक्षात घेऊन त्यावर बोजा पडणार नाही अशा रितीने कररचना तयार केली आहे. कॉंग्रेसने सरसकट 18 टक्के जीएसटी आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यामुळे गरीबावर बोजा पडला असता म्हणून त्याला विरोध केला, असे गोयल यांनी सांगितले.

…तर करांचे दर कमी
सगळ्यांनीच कर भरला तर करांचे दर कमी करण्याबाबत विचार होऊ शकतो. कर स्वरुपात जमा होणारा सुमारे 80 टक्के निधी विविध मार्गांनी पुन्हा राज्य सरकारांकडेच येणार असल्याचे पियूष गोयल यांनी सांगितले. तसेच राज्य आणि केंद्र सरकारला लघु उद्योजकांची काळजी आहे. त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)