जीएसटीमुळे आर्थिक स्थितीत आमूलाग्र बदल

संगमनेर – जीएसटीमुळे वस्तुंच्या किमती कमी होणार असल्याने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ वाढणार आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक स्थितीत आमूलाग्र बदल होणार असल्याची माहिती केंद्रीय उत्पादन शुल्कचे अधीक्षक अनिरुध्द कुलकर्णी यांनी दिली.
वस्तू व सेवा कर यावर जनजागृती करण्यासाठी केंद्रीय उत्पादन शुल्क, संगमनेर रेंज, नगर विभाग व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने संगमनेरात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती; यावेळी कुलकर्णी बोलत होते.
याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष ऍड. माधवराव कानवडे, सांगळे, सुपेकर, राजहंस दूध संघाचे कापडनीस, फास्ट ट्रॅक पॅकर्सचे औटी, केंद्रीय उत्पादन शुल्क, संगमनेर रेंजच्या अधीक्षिका आरिफा काचवाला, निरीक्षक संतोष आडेप, आदींसह व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले की, आधीच्या कर प्रणालीत करावर कर द्यावा लागत होता. त्यामुळे वस्तूंच्या किमती वाढल्या होत्या. आता मात्र एक देश एक कर व एक मार्केट या सूत्रानुसार जीएसटीच्या माध्यमातून एकच कर द्यावा लागत आहे. त्यामुळे वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. कर भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने यात सुसूत्रता येऊन पारदर्शकता वाढणार आहे. तसेच, या करांचा बोजा ग्राहकांवर पडणार नाही. ही प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत व पारदर्शक असल्याने या करप्रणालीचे स्वागत होत आहे.
याप्रसंगी श्रमिक बिडीचे शेख, कॉक ब्रॅण्ड बिडीचे जोंधळे, अगस्ती कारखान्याचे वाकचौरे, अल्फा सोल्युशनचे पवार, दौलत ऍग्रो प्रा.लि.चे गुंजाळ, आदी उपस्थित होते. याप्रसंगी कारखान्याच्या वतीने कुलकर्णी, अधीक्षक काचवाला, संतोष आडेप यांचा शाल, पुष्पगुच्छ व फेटे बांधून सत्कार करण्यात आला. कारखान्याचे सेक्रेटरी किरण कानवडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सुपेकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)