जीएसटीबाबत तक्रार करू नका : पालकमंत्री

दि पूना मर्चंट्‌स चेंबर्सच्या पुरस्कारांचे वितरण

पुणे- व्यापाऱ्यांचे जे काही प्रश्‍न आहेत, ते एकत्र भेटल्यावर कळतात. पूर्वी राज्यात व्यापार केल्या जाणाऱ्या वस्तूंवर जकात होती. ती रद्द करून एलबीटी लावण्यात आली. त्यानंतर आता “जीएसटी’ लावण्यात आला आहे. त्याबाबत व्यापाऱ्यांनी तक्रारी करू नका, असा सल्ला अन्न, नागरी पुरवठा तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिला. सरकार नव्याने आणलेल्या योजनेचे नियोजन करत असते. त्यामध्ये काही त्रुटी असल्यास बदल्याची आमची तयारी आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी जोडले

दि पूना मर्चंट्‌स चेंबर्सच्यावतीने स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा स्मृतीनिमित्ताने देण्यात येणारा आदर्श व्यापारी उत्तम राज्यस्तरावरील पुरस्कार उद्योजक संजय घोडावत, पुणे जिल्हा स्तरावरील पुरस्कार विजय भंडारी, चेंबरचे सदस्य सतीश शहा आणि वि. ल. गवाडिया पत्रकार पुरस्कार स्वप्नील बापट यांना शनिवारी देण्यात आला. त्यावेळी बापट बोलत होते. खासदार अनिल शिरोळे, चेंबर्सचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, वालचंद संचेती, प्रवीण चोरबेले, अशोक लोढा, विजय मुथा आदी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांचे प्रश्‍न आम्ही जाणतो. सर्वच प्रश्‍न सोडविले, तर तुम्ही आमच्याकडे कधी येणार, असा मिश्‍किल प्रश्‍न विचारत जे सोडविण्यासारखे प्रश्‍न आहेत. ते निश्‍चितच सोडवू, असे सांगून बापट म्हणाले, व्यापारी हा उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील दुवा असतो. बाजारात स्पर्धा होताना त्यात टिकून राहणे आणि त्यातही धान्यांसह भुसाराच्या वस्तूंचा माल समाजाला देणे हे कार्य व्यापारी करीत आहेत. महाराष्ट्रात सामूहिकपणे व्यापारी काम करीत आहेत.

हमीभावाबद्दल सध्या शंका उपस्थित केली जात आहे. एकीकडे हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. भाव कमी मिळावेत, यासाठी ग्राहकांची मागणी सुरू झाली. अशा चक्रव्युहात सरकार योजना आखत असते. त्रुटी असल्यास सरकारच्या निदर्शनास आणून द्या. घोडावत म्हणाले, “खडतर परिस्थितीतून उद्योगाला सुरुवात केली. अनेकवेळा अपयश आले. मात्र, कामाशी प्रामाणिक राहिल्याने यश मिळाले.’ यावेळी चेंबरचे अध्यक्ष ओस्तवाल यांनी प्रास्तविक केले. अशोक लोढा यांनी स्वागत केले, तर जवाहरलाल बोथरा यांनी परिचय करून दिला. विजय मुथा यांनी आभार मानले. राजीव गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)