‘जीएसटी’बाबतचे प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत अंमलबजावणी पुढे ढकला

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
मुंबई – देशात वस्तु व सेवा करप्रणालीच्या रूपाने क्रांतीकारक बदल होतो आहे, पण महाराष्ट्रात सबंधित कायदे आणताना घाई केली आहे. आता सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच व्यापाऱ्यांचे करपद्धतीसंबंधी प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत अंमलबजावणी पुढे ढकलण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचे मन वळवा, अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत केली.
जीएसटी संबंधी एका विधेयकावरील चर्चेत भाग घेताना ते बोलत होते. तुम्ही मागचा पुढचा विचार न करता एलबीटी कर रद्द केला ही मोठी चूक होती व ती राज्याला तीस हजार कोटींच्या खड्डयात टाकणारी ठरेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 26 मनपांमध्ये आज जर तो पाच सहा हजार कोटींचा कर असता तर जीएसटीमध्ये तो रद्द झाला असता आणि महाराष्ट्राला तितकी भरपाई पाच वर्षे मिळाली असती. तुम्ही तो कर ऑगस्ट 2015 मध्येच रद्द केला, असे ते म्हणाले.
सध्या 50 कोटींच्यावर व्यवहार असणाऱ्या व्यापाऱ्यांकडून आपण तो घेतो, आता तितकीच भरपाई केंद्र देईल बाकी रद्द कराचा बोजा त्यामुळे आपल्याच डोक्‍यावर राहणार आहे, असा इशारा चव्हाण यांनी दिला.
जीएसटी गोळा करण्याचे काम खाजगी कंपनीला दिले यावर टीका करून पृथ्वीराज म्हणाले की यासाठी गुंतागुंतीची संगणक प्रणाली आहे, पण सध्या व्हायरसचा मोठा धोका आहे त्याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसू शकतो, असाही इशारा त्यांना यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)