जीएसटीतून वाढीव कर संकलनामुळे गुंतवणूकदार सुखावले

शेअर बाजार निर्देशांकात मोठया प्रमाणात वाढ

मुंबई- जूलै महिन्यात एकत्रीत वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून कर संकलनात मोठया प्रमाणात वाढ झाल्याची आकडेवारी काल सरकारने जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी काळातही कर संकलन वाढण्याची शक्‍यता आहे. जीएसटी ही कर प्रणाली आता रूळावर आल्याचे दिसून आल्यानंतर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

आज झालेल्या जोरदार खरेदीमुळे काल झालेली झिज बऱ्याच प्रमाणात भरून निघाली आणि निफ्टी 9800 अंकाच्या वर बंद झाला. काल उत्तर कोरीयाने जपानजवळ क्षेपणात्र डागल्यामुळे जागतीक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारावरही परिणाम झाला होता. मात्र हा मुद्दा चिघळण्याची शक्‍यता मंदावल्यानंतर आज जागतीक बाजारातूनही सकारात्मक संदेश आल्याचे दिसून आले.

बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 258 अंकानी वाढून 31646 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 88 अंकानी वाढून 9800 च्या वर म्हणजे 9884 अंकावर बंद झाला. काल सेन्सेक्‍स 362 अंकानी तर निफ्टी 116 अंकानी कमी झाला होता.

जागातीक बाजाराबरोबरच आज धातू आणि वित्तीय संस्थाच्या शेअरकडे गुंतवणूकदारांचा ओढा असल्याचे दिसून आले. आज शेअर बाजार निर्देशांकाशी महत्वाच्या कंपन्या असलेल्या रिलायन्स, आयटीसी, एचडीएफसी, एल ऍण्ड टि आणि एचडीएफसी या कंपन्याच्या शेअरच्या भावात वाढ झाली. त्यामुळे निर्देशांकाना चांगलाच आधार मिळाला. आज झालेल्या निर्देशांकातील वाढीमुळे कंपन्याच्या गुंतवणूक मुल्यात आज एकाच दिवसात 154994 कोटी रूपयाची वाढ झाली.

मात्र परदेशी संस्थागत गुंतवणूकदार अजूनही भारतीय शेअर बाजारात खरेदी करण्याच्या मनस्थितीत नाहीत. कालही या गुंतवणूकदारांनी 1459 कोटी रूपयाच्या शेअरची विक्री केली. मात्र देशातील संस्थागत गुंवणूकदार खरेदी करीत आहेत. काल या गुंतवणूकदारांनी 1391 कोटी रूपयाच्या शेअरची खरेदी केली. गेल्या अनेक दिवसापासून देशातील संस्थागत गुंतवणूकदारांचा शेअर बाजार निर्देशांकाना चांगलाच आधार मिळत आहे.

आज मोठ्या कंपन्यापेक्षा छोट्या कंपन्याच्या शेअरची जास्त खरेदी झाली. त्यामुळे मिडकॅप 1.49 टक्‍क्‍यानी तर स्मॉल कॅप 1.33 टक्‍क्‍यानी वाढला. आज धातू क्षेत्राचा निर्देशशंक सर्वात जास्त म्हणजे 2.59 टक्‍क्‍यानी वाढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)