जिल्ह्यात 17 कारखान्यांनी एफआरपीचे थकविले 343 कोटी

संग्रहित छायाचित्र....

सर्वाधिक डॉ. विखे कारखान्याकडे 66 कोटी 49 लाख थकीत : पाच कारखान्यांकडून शंभर टक्‍के एफआरपी अदा

नगर: नगर जिल्ह्यात 17 सहकारी व खासगी साखर कारखान्यांची तब्बल 342 कोटी 93 लाख 79 हजार रुपये एफआरपी थकली आहे. 14 दिवसांत एकरकमी एफआरपी देण्याचे कायदेशीर बंधन असूनही कारखान्यांनी एफआरपी न दिलेली नाही. 1 नोव्हेंबरपासून कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून तेव्हापासूनची एफआरपीची रक्‍कम काही कारखान्यांची थकली आहे. त्यात सर्वाधिक डॉ. विखे पाटील कारखान्याकडे 66 कोटी 49 लाख 79 हजार रुपये एफआरपी थकली आहे. उसाची बिले वेळेत जमा न झाल्याने कर्जावरील वाढीव व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. बॅंकांची कर्ज वसुली, घरबांधणी, लग्नसराईवरही याचा परिणाम जाणवू लागला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

17 कारखान्यांकडे ही एफआरपी थकली असतांना ज्ञानेश्‍वर, मुळा, कर्मवीर काळे, सहकार महर्षी थोरात व संजीवनी या पाच कारखान्यांनी मात्र शंभर टक्‍के एफआरपीची रक्‍कम शेतकऱ्यांना अदा केली आहे. त्यामुळे हे कारखाने देवू शकतात मग अन्य कारखान्यांची काय अडचण आहे. असा सवाल शेतकऱ्यांकडून होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे कोसळलेले दर, देशातंर्गत बाजारपेठेत कमी झालेली मागणी, बॅंकाकडून उपलब्ध होणाऱ्या कर्जातून एफआरपी भागवताना येणारा 400 ते 600 रुपयांचा दुरावा यामुळे यंदा राज्यातील 188 कारखान्यांची 3557 कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. साखरेचे कोठार म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यातील 17 सहकारी व खासगी कारखानदारांकडून दोन महिन्यांच्या उसाची तब्बल 342 कोटी 93 लाख 79 हजार रुपये एफआरपीची रक्कम थकली आहे.

हंगाम सुरू होवू दोन महिने झाले आहेत. तरी काही कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना एफआरपीनुसार रक्‍कम अदा केलेली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. दुष्काळात शेतकऱ्यांना ऊसाचा आर्थिक आधार वाटत होता. परंतू ते हक्‍काचे पैसे मिळत नसल्याने कोणाकडे दाद मागावी असा प्रश्‍न पडला आहे. शेतकरी संघटना एफआरपीपेक्षा दोनशे रूपये जास्त भाव देण्याच्या मागणीसाठी सुरूवातीला आंदोलन करण्याच्या प्रयत्न होते. परंतू आता शेतकऱ्यांना त्याच्या हक्‍काची एफआरपीची रक्‍कम मिळत नसतांनाही शेतकरी संघटना गप्प का हे कळत नाही.

डॉ. विखे पाटील कारखान्याने आतापर्यंत 3 टक्‍के एफआरपी अदा केली आहे. त्यामुळे 66 कोटी 49 लाख 79 सर्वाधिक थकबाकी या कारखान्याकडे आहे. त्याखालोखाल अंबालिका कारखान्याकडे 61 कोटी 10 लाख 74 हजार एफआरपी थकली असून या कारखान्याने आतापर्यंत 56 टक्‍के एफआरपी अदा केली आहे. त्यापाठोपाठ कुकडीकडे 41 कोटी 80 लाख, साईकुपा 22 कोटी 33 लाख 98 हजार, गंगामाई 21 कोटी 35 लाख 69 हजार, डॉ. तनपुरे 21 कोटी 85 लाख 16 हजार, केदारेश्‍वर 17 कोटी 71 लाख 58 हजार, अगस्ती 7 कोटी 34 लाख 23 हजार, अशोक 5 कोटी 1 लाख 85 हजार, गणेश 13 कोटी 85 लाख 2 हजार, सहकार महर्षी नागवडे 7 कोटी 45 लाख 1 हजार, वृद्धेश्‍वर 1 कोटी 75 लाख 29 हजार, प्रियुश 7 कोटी 9 लाख 37 हजार, प्रसाद शुगर 9 कोटी 80 लाख 93 हजार, जयश्रीराम 14 कोटी 55 लाख 75 हजार, श्री क्रांती शुगर 2 कोटी 48 लाख 46 हजार, युटेक शुगर 20 कोटी 90 लाख 18 हजार. याप्रमाणे या 17 कारखान्यांकडे एफआरपी थकली आहे.


आजपर्यंत 65 लाख गाळप

या गळीत हंगामात आजपर्यंत 64 लाख 49 हजार 659.41 मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले असून त्यापासून 66 लाख 50 हजार 30 क्‍विंटल साखर पोती उत्पादीत झाली आहे. सुमारे 10.31 साखर उतारा आला आहे. त्यात सहकारी कारखान्यांनी 43 लाख 3 हजार 411. 41 मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले असून त्यापासून 44 लाख 62 हजार 885 क्‍विंटल साखरपोती तयार झाली आहे. तर खासगी कारखान्यांनी 21 लाख 46 हजार 248 मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून 21 लाख 87 हजार 145 क्‍विंटल साखर पोती तयार केल्या आहेत.


आठ कारखान्यांकडून देय रक्‍कम जाहीर नाही

23 कारखान्यापैकी आठ कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना प्रतीटन देय रक्‍कम अद्यापही जाहीर केलेली नाही. त्यात डॉ. विखे पाटील, गणेश, कर्मवीर काळे, कुकडी, केदारेश्‍वर, डॉ. तनपुरे, प्रियुश, श्रीराम, साईकुपा यांनी अंतिम भाव जाहीर केलेला नाही. त्यामानाने ज्ञानेश्‍वरने एफआरपीपेखा एक रुपया जास्त देवून 2445, मुळाने देखील एक रुपया जास्त देवून 2353, थोरातने 15 रुपये जास्त देवून 2500, प्रसादने साडेतीन रुपये जास्त देवून 2100 याप्रमाणे भाव दिला आहे. अगस्तीने 20 रुपये जास्त देवून 2400 रुपये भाव दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)