जिल्ह्यात 1 लाख 28 हजार शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

19 लाख 7 हजार 954 क्‍विंटल कांद्या विक्रीचे मिळणार 38 कोटी 15 लाख

नगर: कांद्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण व त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचे जाहीर केल्यानुसार त्याचा लाभ जिल्ह्यातील 1 लाख 28 हजार 668 शेतकऱ्यांना होणार आहे. जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमध्ये 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या दीड महिन्याच्या कालावधीत सुमारे 19 लाख 7 हजार 954 क्विंटलहून अधिक कांद्याची विक्री करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्‍त केला जात आहे. दोनशे रुपये अनुदानाप्रमाणे जिल्ह्यातील 1 लाख 28 हजार 668 शेतकऱ्यांना 38 कोटी 15 लाख रुपये अनुदान मिळले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाळ कांद्याचे भाव सातत्याने घसरू लागले असून, 50 पैसे ते एक रुपये दराने कांदा विक्री झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. त्यातून बाजार समित्यांचे कामकाज बंद पाडणे, रस्त्यावर कांदा ओतणे, सरकार व बाजार समितींच्या विरोधात रास्ता रोको अशा स्वरूपाचे आंदोलने केली जात आहे. भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा बाजार समितीत आणणे बंद केले, परिणामी चाळीतही कांदा सडू लागला आहे. अगोदरच दुष्काळी परिस्थिती असताना त्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष सरकारला महागात पडू शकतो हे हेरून शासनाने दि. 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या काळात बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला असून, शासनाने सहकार खात्याकडून प्रत्येक जिल्ह्याची माहिती मागविली आहे.

जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमध्ये गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत 1 लाख 28 हजार 668 शेतकऱ्यांनी 19 लाख 7 हजार 854 क्विंटल कांद्याची पडत्या भावात विक्री केली आहे. शासनाच्या निर्णयानुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 38 कोटी 15 लाख रुपये अनुदान अदा केले जाणार आहे. अर्थात जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गेल्या दीड महिन्यात विकला गेलेल्या कांद्याला अनुदान मिळणार आहे. यापूर्वी देखील शासनाने कांद्यासाठी अनुदान दिले होते. परंतू त्यावेळी अनेक अडचणीमुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिला होता. सातबारा उतारा एकाच्या नावावर व कांदा विक्री दुसऱ्याच्या नावावर झालेली, दुसऱ्या तालुक्‍यात कांद्याची विक्री आदी अडचणी गेल्यावेळी आल्या होत्या. त्यामुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते. गेल्यावेळी 18 कोटी रुपये अनुदान नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले होते. परंतू यंदा अनुदानात वाढ झाल्याने एकून जिल्ह्याला मिळणाऱ्या अनुदानाच्या रक्‍कमेत वाढ झाली आहे. ज्या शेतकऱ्यांचा जास्त कांदा विकला गेला आहे. त्यांना जास्त अनुदान मिळणार आहे. सध्या सहकार खात्याने जिल्ह्यातील 14 बाजार समितींमध्ये गेल्या दीड महिन्यात झालेल्या कांदा विक्रीची माहिती दिली. त्यानुसार शेतकरी संख्या व विकला गेलेल्या कांद्याचे वचन निश्‍चित करण्यात आहे आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक द्विगविजय आहेर यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)