जिल्ह्यात सुरू असलेल्या योजनांसाठी 351 कोटींची मंजुरी

नगर – जिल्हा वार्षिक योजनेत 2017-18 जिल्ह्यात सुरू असलेल्या योजनांसाठी 351 कोटींची मंजुरी मिळाली आहे. या योजनेत जलयुक्‍त शिवार अभियानाशी निगडित कृषी, वने, जलसंधारण विभाग व इतर योजनांकरिता वाढीव तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत आर्थिक मर्यादेपेक्षा 9.26 टक्‍के म्हणजेच 29.78 कोटींची वाढीव तरतूद केलेली आहे. या वार्षिक आराखड्यातील विकासकामे प्रभावीपणे राबविल्याने राज्यात नगर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे, अशी माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनाचा खर्चाचा आढावा बैठकीनंतर ना. शिंदे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. संग्राम जगताप, आ. विजय औटी, आ. शिवाजी कर्डिले, आ. मोनिका राजळे, आ. राहुल जगताप, आ. भाऊसाहेब कांबळे, जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे, महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले की, आतापर्यंत झालेल्या जलयुक्‍तच्या कामात कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. आतापर्यंत राज्यात 3 लाख 35 हजार कामे केली आहेत. या जलयुक्‍तच्या कामात जर कोठेही गैरव्यवहार झाला तर आम्ही त्या-त्या स्तरावर कारवाई करू. ग्रामविकास खात्याच्या जो 5054 चा निर्णय आ. कर्डिले यांनी उपस्थित केला होता त्याला विरोधी पक्षाने अनुमती दिली आहे. हा सर्व ठराव समन्वयाने करून या सर्वांनी पालकमंत्री यांना त्यांचे अधिकार दिले आहे. तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत हरी पुरुषोत्तम मंदिर, कासार दुमाला, क्षेत्र अमृतेश्‍वर देवस्थान ट्रस्ट तसेच प.पू. अमरगिरी महाराज खानेश्‍वर देवस्थान, संगमनेर. श्रीक्षेत्र पिंपळेश्‍वर देवस्थान, विरोली, पारनेर, श्री गणेश देवस्थान, गणेशखिंड, वांगी, श्रीरामपूर या यात्रास्थळांना “क’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे. त्यानंतर आयत्या वेळी उपस्थित झालेल्या शेवगाव येथील आरोग्य केंद्र मौजे-घोटण स्थलांतर करण्यासाठी समितीने मान्यता दिली आहे.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावित केलेल्या बागायती रोपमळ्याची स्थापना व बळकटीकरणासाठी 30 लाख, पीक संरक्षण योजनेसाठी 60 लाख, पडीक जमीन विकासाच्या कार्यक्रमासाठी 1 लाख, कृषी चिकित्सालय योजनेसाठी 8 लाख, 101 ते 250 ल. पा. योजनेसाठी 10 लाख, मधमाशा पालन योजना 1 लाख या योजना नियोजन विभागाने वगळल्यामुळे त्यासाठी 66 लाखांची तरतूद उपलब्ध झाली आहे.

स्वच्छ भारत मिशन या योजनेसाठी यापूर्वीची तरतूद 5 लाख 646 मधून 2 लाख 823 रुपयांची तरतूद कपात करण्यात आल्यामुळे इतर योजनांसाठी ही रक्‍कम उपलब्ध झाली आहे. अशा प्रकारे 5 लाख 867 इतकी रक्‍कम जलयुक्‍त शिवार अभियान, वृक्षलागवड, मुख्यमंत्री ग्रामसडक, नगर विकास, रस्ते विकास जिल्हा परिषदेकडे योजनांसाठी अर्थसंकल्पित करण्यात आलेली आहे.
जिल्हा वार्षिक योजनेत मंजूर झालेल्या सर्वसाधारण योजनेसाठी 351.35 कोटी, तर आदिवासी योजनेसाठी 78.06 व अनुसूचित जातीसाठी 140.45 असे एकूण 569 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

अर्थसंकल्पित तरतुदींचा क्षेत्रनिहाय तपशील (रुपये लाखात)
क्षेत्र जिनिसने प्रस्तावित अर्थसंकल्पित तरतूद
कृषी व संलग्न सेवा 5436.48 8883.98
ग्रामीण विकास 911.00 1060.00
पाटबंधारे व पूरनियंत्रण 1421.00 1401.00
ऊर्जा 60.00 110.00
उद्योग व खाण 53.00 52.00
परिवहन 8738.55 9457.75
सामान्य आर्थिक सेवा 620.00 620.00
सामाजिक सेवा 13202.97 10987.37
सामान्य सेवा 96.15 96.15
इतर जिल्हा योजना 10.00 710.00
नावीन्यपूर्ण योजना 1607.85 1756.75

शेतकऱ्यांना कर्ज देण्याला प्राधान्य (जिल्हाधिकारी यांचा पासपोर्ट फोटो वापरणे)
शेतकऱ्यांना जे 10 हजार रुपयांपर्यंत कर्जवाटप करण्यात येणार आहे ते कर्ज देण्यासाठी बॅंकेला काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्या त्रुटींसंदर्भात राज्य कमिटीला आम्ही कळविले आहे. त्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. यासंदर्भात त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना कर्ज देण्याला प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिली आहे.

शेवगावातील घटना अतिशय गंभीर बाब (पालकमंत्री राम शिंदे यांचा पासपोर्ट फोटो टाकणे)
शेवगाव येथे हारवणे कुटुंबाला जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा असे आम्ही तिघांनी भेट दिली. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, या कुटुंबाची अतिशय निर्घृणपणे हत्या झाली आहे. गरीब कुटुंबात ही घटना घडली असून, ही अतिशय गंबीर बाब आहे. हा तपास आता एलसीबीकडे वर्ग करण्यात आला आहे. या मृत व्यक्‍तींचे शवविच्छेदन करण्यासाठी औरंगाबाद येथे पाठविले आहे. त्यात पंचनाम्यामध्ये काही त्रुटी न रहावी यासाठी वेळ लागला आहे. या आरोपींना पोलीस लवकरात-लवकर कारवाई करून ताब्यात घेतील, अशी माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)