जिल्ह्यात सात लाखांच्या मुद्देमालावर चोरांची हातसफाई

गायीच्या चोरींपासून, दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम, दागिन्यांची चोरी

नगर – जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या घरफोडी आणि चोरीत चोरांनी सुमारे 7 लाख 17 हजार 850 रुपयांच्या मुद्देमालावर हातसफाई केली आहे. गायीच्या चोरींपासून, दुचाकी, मोबाईल, विद्युतपंप, रोख रक्कम, लॅपटॉप, दागिन्यांच्या मालाचा चोरींचा यात समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोल्हार बुद्रुक येथील संतोष लोणकर (रा. लक्ष्मीबाई कुंकलोळ कॉम्प्लेक्‍स, बेलापूर रोड) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी घरातून रोख रक्कम 40 हजार रुपये आणि 1 लाखांचे दागिने चोरून नेले. शेख असरार सईद (रा. जाकीर हुसेन शाळेजवळ, मुकुंदनगर) यांचा मेडिकल दुकानातून चोरांनी 18 हजार रुपयांची रक्कम आणि लॅपटॉप चोरून नेले आहेत. पाथर्डीतील तिसगाव येथील बाबासाहेब इंगळे यांच्या घरातून 54 हजारांचा दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरांनी घराची कडी उखडून आतमध्ये प्रवेश करून ही चोरी केली आहे. श्रीगोंद्यातील बोडखेवस्तीवर काका तोंडे यांच्या घरातून चोरांनी 38 हजारांची रक्कम आणि 21 हजारांचा दागिने चोरून नेले आहेत. चोरांनी घरात घुसून ही चोरी केली आहे.

नागरदेवळे (ता. नगर) येथील अमिना कॉलनीतील मोहमंद शहा यांच्या खिशातून चोरांनी 72 हजार रुपयांची रक्कम चोरून नेली आहे. तुषार गावखरे (रा. चास, ता. नगर) यांची 60 हजार रुपयांची दुचाकी चोरांनी चोरली आहे. श्रीगोंद्यातील वडाळी रोडवरील एसएनएल ऑफिसजवळ सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणाहून सुमारे सहा मोबाईल चोरांनी चोरून नेले आहेत. विजयबाबू कसैब (रा. उत्तरप्रदेश) यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. सुमारे 19 हजार 500 रुपयांचे हे मोबाईल होते.

नाऊर (ता. श्रीरामपूर) येथून सोन्याबापू शिंदे यांच्याकडील कॉपर वायर आणि विद्युत कृषीपंप असे एकूण 37 हजार 350 रुपयांचे साहित्य चोरांनी चोरले आहे. राहुरी येथील अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोरून मच्छिंद्र कांबळे (रा. खंडाळा) यांचा 26 हजार रुपयांचा मोबाईल चोरांनी चोरून नेले आहे. राहुरी येथील प्रासदनगरमधून मंदा साहेबराव आल्हाटे (वय 65) यांची 12 हजार रुपयांची गाय चोरांनी चोरली आहे. राजूर येथील प्रकल्प कार्यालयात कार्यरत असलेले पोपट मारूती गभाले यांच्या घरातून चोरांनी 70 हजारांची रक्कम आणि 1 लाख 20 हजारांचे दागिने चोरून नेले आहेत. राहात्यातील गणेशनगरमधील आठवडे बाजारातून शिवाजी तरकसे (रा. तरकसवाडी, अस्तगांव) यांची 10 हजार रुपयांची दुचाकी चोरांनी चोरली. कोपरगाव येथील गोखरोबागल्लीतून नितीन अशोक बोरूडे यांची 20 हजार रुपयांची दुचाकी चोरांनी चोरून नेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)