जिल्ह्यात वाळूतस्करांविरोधात महसूल विभाग आक्रमक

नगर – जिल्ह्यात मुळा, प्रवरा, भीमासह इतर नदीपात्रांतून वाळूचा अवैध उपसा करणाऱ्या तस्करांविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. वीसहून अधिक वाहने जप्त करण्यात आली असून, अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या कारवाईमुळे या गोरखधंद्याला चाप बसणार आहे.

वाळूतस्करांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा महसूल विभागाने सपाटा लावल्याने वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहे. संगमनेर शिवारात दि. 10 रोजी कौठेमलकापूर ते वरवंडी रोडवर सुमारे 5 ब्रास वाळू भरलेल्या ट्रकच्या चालकांसह तिघांवर आश्‍वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, तलाठी रामदास मारुती मुळे व त्यांचे सहकारी यांनी तहसीलदार यांच्या आदेशाने अवैध वाळूउपसा करणाऱ्या वाळूतस्करांना प्रतिबंध करण्यासाठी कारवाई करत असताना संगमनेर गावच्या शिवारात कौठेमलकापूर ते वरवंडी रोडवर मलकापूर गावाकडून एक 10 टायरचा ट्रक (एमएच 42 बी. 0010) संशयितरीत्या आला. त्यात सुमारे 5 ब्रास वाळू भरलेली होती. ट्रकचालक मंगेश धोंडिबा शेंडगे (रा. साकूर, ता. संगमनेर) हा वाळू चोरून नेत असल्यामुळे त्याला आश्‍वी पोलीस ठाण्याकडे गाडी नेण्यास सांगितले असता यावेळी शिवारातील रस्त्यात ट्रक जंगलाकडे उभा करून तो पसार झाला. त्यावेळी मुळे हे ट्रक आश्‍वी पोलीस ठाण्यात नेत असताना गावच्या शिवारात पाझर तलावाजवळ मंगेश धोंडिबा शेंडगे, रावसाहेब लहानू खेमनर (रा. साकूर, ता. संगमनेर), बाळू पोंदे (रा. खांबे, ता. संगमनेर), अनिल भांडकोळी (रा. चिखलठाणा, ता. राहुरी) अशा चौघाजणांनी तो ट्रक अडवून लोखंडी गज घेऊन जीवे मारण्याची धमकी देत चौघेजण ट्रक घेऊन पसार झाले. त्यांच्याविरूद्ध आश्‍वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मागील काळातील धडक कारवाई
मागील काळातही श्रीगोंदा, पाथर्डी, राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव या ठिकाणी महसूल विभागाने वाळूतस्करांवर, अवैध वाळूउपसा करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पाथर्डी येथे तहसीलदार खुराणा यांनी वीसपेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करून 5 लाखांचा दंड वसूल केला होता. तसेच, जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी श्रीगोंदा येथील राजापूर, काष्टी शिवारात आजवरची सर्वात मोठी कारवाई केली होती. पोलीस व महसूल यांच्या संयुक्‍त पथकाने शेवगाव तालुक्‍यातील मुंगी येथील गोदावरी नदीपात्रात बेकायदा वाळूवाहतूक करणाऱ्या वाळूतस्करांविरोधात धडक कारवाई करून 18 वाहने पकडली होती.

वाळूतस्करांचा कोतवालावर हल्ला
श्रीरामपूर येथे दि. 10 रोजी विश्‍वजित उर्फ बच्चू दिनकर बडाख याने “माझ्या शेतात वाळूच्या गाड्यांवर कारवाई करता का?’ असे म्हणून कोतवालाला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करण्याची घटना घडली असून, श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे महसूल विभागाने वाळूतस्करांवर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे.

जिल्ह्यातील अवैध वाळूउपसा विरोधातील कारवाई अधिक तीव्र करून वाळूतस्करांच्या मुसक्‍या आवळण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात 40 ठिकाणी चेकपोस्ट तयार करून त्यामार्फत प्रत्येक ठिकाणी कारवाई चालूच राहणार आहे.
संजय एम. बाम्हणे
जिल्हा खनिकर्म अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)