जिल्ह्यात डीपीटी लसीचा तुटवडा

लोणी- शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिकदृष्ट्‌या पुढारलेल्या (?) पुणे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर सर्वाधिक खर्च केला जात असल्याचा जिल्हा परिषदेचा दावा खोटा ठरत असल्याचे उघड झाले आहे. कारण, दिड वर्षाच्या बाळाला देण्यात येणाऱ्या डीपीटी लसीचा गेल्या सहा महिन्यांपासून संपुर्ण जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. या संदर्भात राज्य सरकार किंवा जिल्हा परिषद प्रशासनाने कुठलीही हालचाल केलेली नाही. या लसीची खुल्या बाजारातील किंमत तब्बल 1800 रुपये आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या बालकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून पालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागात अधिक प्रमाण असलेल्या टिटनेस या आजारासह अन्य तीन साथीच्या आजारांवर अतिशय प्रभावी आणि उपयुक्त ठरत असलेल्या डीपीटी लसीचा तुटवडा जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य केंद्रात जाणवत आहे. याबाबत, जिल्ह्यातील काही प्रमुख आरोग्य केंद्राशी संपर्क साधून माहिती घेतली असता, या लसीचा पुरवठा सध्या बंद असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. बाळाचा जन्म झाल्यावर साधारण पाच वर्षापर्यंत बाळाला विविध प्रकारच्या लसी प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे दिल्या जातात. या लसी खुल्या बाजारात उपलब्ध असतात. परंतु, त्यांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात नाहीत.
लोकशाही व कल्याणकारी राज्यात आर्थिकदृष्ट्‌या कमकुवत असणाऱ्या पालकांच्या लहान बाळांची हेळसांड होऊ नये व पुढील पिढी आरोग्य संपन्न असावी याकरिता राज्य सरकारच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून या लसींचा पुरवठा केला जातो. शासनाने ठरवून दिलेल्या निकषां नुसार संबंधित परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून दिड वर्षाच्या बाळाला देण्यात येणारी डीपीटी लस पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून गायब झाली आहे. आजपर्यंत या लसीचा आवश्‍यक एवढा पुरवठा करण्यात राज्य सरकार व जिल्हा परिषद आरोग्य विभाग अपयशी ठरला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून दिड वर्षाच्या बाळाला घेऊन पालक प्राथमिक आरोग्य केंद्रात जात आहेत. परंतु, लस उपलब्ध नाही, असे कारण सांगून त्यांना परत पाठवले जात आहे. जे पालक आर्थिकदृष्ट्‌या सक्षम आहेत त्यांनी सरकारी दवाखान्याऐवजी खासगी रुग्णालयात जाऊन आपल्या बाळांना ही लस दिली आहे. परंतु, जे पालक आर्थिकदृष्ट्‌या सक्षम नाहीत त्यांच्या बाळांना सहा महिने झाले तरी ही लस प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळू शकलेली नाही. कारण, या लसीची खुल्या बाजारातील किंमत तब्बल 1800 रुपये आहे. त्यामुळे राज्य सरकार व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याची दखल घेऊन तातडीने या लसीचा आवश्‍यक एवढा पुरवठा पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

  • अन्य लसींचाही कमी पुरवठा?
    नवजात बालकाच्या जन्मापासून होणाऱ्या लसीकरण कार्यक्रमात बालकांना साधारणत: 13 ते 14 लसी दिल्या जातात. यापैकी बहुतांशी लसींचा पुरवठा कमी, अधिक प्रमाणात होत असताना जिल्हा आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे ग्रामीण रूग्णालयातून सांगण्यात आले. त्यातही डीपीटी सारख्या प्रभावी लसीचा तुवटा निर्माण होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रविण माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)