जिल्ह्यात खरिपाचा हंगामाचा पेरा 63 टक्के

नगर- जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी दमदार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर खरीप हंगामाचे चित्र आशादायक होत आहे. पाऊस झाल्याने बाजरी, तूर, मका, उडीद, सोयाबीन, पिकांचे क्षेत्र यंदा वाढत आहे. त्याचबरोबर कांदा लागवडीच्या क्षेत्रातही वाढ होईल, पुनर्वसू नक्षत्रात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला आता वेग येणार आहे. असा अंदाज कृषी विभागामार्फत व्यक्‍त करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या अखेरीस हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांच्या 63 टक्के पेरा झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले.
पुनर्वसू नक्षत्रात पाऊस झाल्याने बाजरी, कांदा या पिकात मोठ्याप्रमाणात वाढ होईल, असा अंदाज आहे. शिवारात वाढलेल्या जलस्तरामुळे मुबलक पाणी उपलब्ध असल्याने कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने कांद्या खालचे क्षेत्र वाढणार आहे. त्याप्रमाणे भाजीपाल्याच्या क्षेत्रातही वाढ होईल.
जिल्ह्यात खरीप हंगामात भात-4503, बाजरी-64811, मका-27555, तूर-17755, मूग-28518, उडीद-19917, भुईमूग-3220, तीळ-21, कारळे-116, सूर्यफूल-25, सोयाबीन-47444, कापूस-48125, अशा एकूण 265417 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.
जिल्ह्यात कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार खरीप हंगामाखाली 5 लाख 28 हजार 858 हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे. पुनर्वसू नक्षत्रात झालेल्या पावसाने बहुतांशी ठिकाणी हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीला वेग येणार आहे. आणखी 8 दिवस पावसाने दडी मारली असती तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले असते.

खरीप हंगामाच्या पेरणीला येणार गती
जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा आणि अकोले तालुक्‍याच्या काही परिसरात खरीप हंगामाची पिके प्राधान्याने पूर्वापार घेतली जातात. यंदा बरसलेल्या पावसामुळे खरीप हंगामाचा आशावाद बळावला. त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला गती येणार असल्याचे आशादायक चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)