जिल्ह्यात कर्करोगाचे 201 रुग्ण

तपासणी अहवालातून संशयित रुग्ण सहा हजारांवर

पुणे – जिल्हा परिषदेने स्व आर. आर. पाटील कॅन्सर साक्षर व मुक्‍त अभियानाअंतर्गत राबविलेल्या तपासणी अहवालातून जिल्ह्यात कॅन्सरचे 201 रूग्ण आढळून आले आहेत. तर संशयित रुग्णांची संख्या सहा हजार एवढी असून, रूग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे. दरम्यान, बारामती, जुन्नर आणि खेड या तीन तालुक्‍यात हे रूग्ण आढळून आले आहे. तर संशयित रुग्ण हे सर्व तालुक्‍यातील आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने स्तनाचा, गर्भाशय आणि मुख कर्करोगाचे रूग्ण अधिक असल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे.

राज्यासह देशाला कॅन्सर या दुर्धर आजाराने विळखा घातला असून, कॅन्सरचे वेळीच निदान झाले तर व्यक्‍तीचे आयुष्यमान वाढते. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यात स्व आर. आर. (आबा) पाटील कॅन्सर साक्षर व कॅन्सरमुक्‍त अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. कर्करोग होण्याची प्रमुख लक्षणे असलेल्या प्रश्‍नांची नियमावली तयार करून त्या गुणांक पद्धती ठेवण्यात आली. त्यानुसार प्रत्येकाच्या घरी जावून त्यांची जीवनशैली आणि तयार केलेल्या प्रश्‍नामध्ये किती गुण येतात, याची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये अधिक गुण आलेल्या संशयित व्यक्‍तींची तपासणी करण्यात आली.

त्यामध्ये जिल्ह्यातील 30 वर्षे वयावरील व्यक्‍तींची एकूण संख्या 37 लाख 94 हजार 151 इतकी आहे. त्यातील 2 लाख 84 हजार 44 पुरूष तर 2 लाख 36 हजार 405 महिला, असे एकूण 5 लाख 19 हजार 849 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये स्तनाचा कर्करोग असलेल्या 61 महिला, गर्भाशय मुखाचा कर्करोग असलेल्या 55 महिला आढळून आल्या. तर मुख कर्करोगामध्ये 85 व्यक्‍ती (स्त्री-पुरूष दोन्ही) आढळून आले. जिल्ह्यात सर्वेनुसार ही संख्या कमी दिसत असली तरी कर्करोगाचे वाढते प्रमाण भीतीदायक आहे. दरम्यान, यातील बहुतांश रुग्णांना पहिल्या स्टेजला कर्करोग असल्याचे निदान झाल्यामुळे उपचारही वेळेत सुरू करणे शक्‍य झाले असून, त्यांचे आयुर्मान वाढलेले आहे. त्यामुळे या अभियानाचा फायदा अनेकांना झाला.

नागरिकांनी नियमित तपासणी करावी
जिल्हा परिषदेने राबविलेल्या अभियानातून कर्करोगाचे 201 रूग्ण आढळून आले आहे. आपल्याला कर्करोग असेल, अशी शक्‍यताही नसताना अचानक या आजाराचे निदान झाल्यावर रूग्णांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र, पहिल्या स्टेजला निदान झाल्यामुळे या रूग्णांना उपचार करणे शक्‍य झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळच्या वेळी कर्करोग आणि आवश्‍यक त्या तपासण्या करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)