जिल्ह्यात कडकडीत बंद

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सातारा तालुक्यातील मराठा बांधवानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आदोंलन केले. मराठा मुलींनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. त्यानंतर मराठा समाज बांधवांनी आई तुळजाभवानीचा जागर घालत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या मारला. यावेळी कोणाताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी सातारा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. शहरातील सर्व प्रकारची वाहतूक बंद होती. मराठा समाजाने केलेला बंद शांतेत व यशस्वी झाल्याचे संयोजकांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहाच्या सुमारास मराठा बांधव सातारा तालुक्यातील ठिकठिकाणावरून जमले. त्यानंतर जिजाऊ वंदना करून ठिय्या आंदोलनाला सुरूवात झाली. सकाळी आकरा वाजता जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना मराठा समाजाच्या मुलींनी मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारत मराठा बांधवांनी जय जिजाऊ, जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे यासारख्या घोषणांनी परिसर दणाणुन सोडला. सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत मराठा बांधवांनी भजन करत सरकारचा निषेध केला. दुपारी तीन वाजता मराठा मोर्चा आंदोलनातील शहीद मराठा बांधवाना श्रध्दांजली वाहुन तसेच राष्ट्रगिताने आंदोलानाची सांगता झाली.
सातार्‍यात गुरूवारी सकाळपासूनच व्यावसायिकांनी बंदला पांठीबा देत बाजारपेठ पुर्णपणे बंद ठेवली होती. आंदोलनामुळे शाळा, महाविद्यालयांनीही सुट्टी जाहीर केली होती. शहरातील व परिसरातील एसटी व खासगी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती. एस टी बंद असल्यामुळे सातारा मध्यवर्ती बसस्थानकात शुकशुकाट होता. बंद दरम्यान कोणाताही हिंसक प्रकार घडु नये म्हणुन जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर अधीक्षक विजय पवार यांनी बंदोबस्ताचे बारकाईने नियोजन केले होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सातारा शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील पेट्रोलपंप, बँकाचे व्यवहार, शाळा, कॉलेजेस बंद होती. मराठा आरक्षणासाठी पाळण्यात आलेल्या बंदला सातार्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सातार्‍यातून एसटी डेपोतून एकही बस बाहेर न पडल्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन ठप्प झाले.
जिल्ह्यात कडकडीत बंद
पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात महाराष्ट्र बंदला पुन्हा हिंसक वळण लागलेले असताना सातारा जिल्ह्यात मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी ठिकठिकाणी शिस्तबध्द रित्या ठिय्या आंदोलन केले. जावलीत बैलगाडी मोर्चा सातार्‍यात भजन कीर्तन फलटणमध्ये मुंडण आंदोलन तर तासवडे टोलनाक्यावर रास्ता रोको करत आंदोलकांनी बंदची ताकत दाखवून दिली . पोलिसांनी जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही . जिल्ह्यात झालेल्या कडकडीत बंदचा फटका दळणवळण व तातडीच्या सेवा बंद राहिल्याने सर्वसामान्यांना बसला . मात्र आंदोलकाच्या आडून वित्तहानी करणार्‍यांवर पोलिसांची करडी नजर राहिल्याने ठिय्या आंदोलन शांततेत पार पाडले .
मे महिन्याच्या ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन व पोलीस यांनी बारकाईने होमवर्क करत बंदोबस्त व समायोजनाचे नियोजन केले होते . जिल्हयाच्या प्रत्येक उपविभागाचे उपअधीक्षक व प्रांत यांच्याशी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व पोलीस अधीक्षक देशमुख यांनी संपर्क करून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या . सातारा जिल्हयाचा कडकडीत बंद निषेधाच्या वेगवेगळ्या प्रकारांनी गाजला . खटाव तालुक्यात मायणी ते वडूज हे सत्तावीस किलोमीटरचे अंतर चालत जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले . त्यानंतर वेगवेगळ्या खेळांचे डाव रंगले . सातार्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी भजन, कीर्तन करत आरक्षणासाठी शासनाचे लक्ष वेधले . तसेच फोडजाई मंदिराच्या प्रांगणात चक्क देवीचा गोंधळ घालण्यात आला . नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले . कराडमध्ये कोल्हापूर नाक्यावर तब्बल दीड तास रास्ता रोको करण्यात आला . महामार्ग रोखण्यात आल्याने बराच काळ वाहतूक मंदावली होती . खबरदारीच्या दृष्टीकोनातून या रास्ता रोको चे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले . कराड तालुक्यातील काशीळ हद्दीतील तास व डे टोल नाक्यावर आंदोलकांनी ठिय्या दिल्याने महामार्ग वाहतूक विस्कळीत झाली . कराड – विटा राज्यमार्गही दीड तास रोखून धरण्यात आल्याने तीन तास टॅफिक जॅमचा प्रचंड गोंधळ झाला . जावली तालुक्याचे मुख्य केंद्र असणार्‍या मेढा येथे तहसील कार्यालयावर चक्क बैलगाडी मोर्चा काढण्यात येउन शासनाचा निषेध करण्यात आला .फलटणमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आल्याने जनजीवन ठप्प झाले होते . येथील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलकांनी ठिय्या देत प्रशासनाला निवेदन सादर केले . खंडाळा व वाई तालुक्यात मोर्चात राजकीय प्रतिनिधी सहभागी झाले . आमदार मंकरंद पाटील यांनी वाईत तर पुरूषोत्तम जाधव यांनी खंडाळ्यात मोर्चात सहभाग नोंदवला पण कटाक्षाने भाषणबाजी टाळली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)