जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात तलाव कोरडे

यवत – पावसाळा सुरू होऊन साधारणतः अडीच महिने झाले तरी धरण क्षेत्र सोडता पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोठेच समाधानकारक पाऊस झाला नाही. बहुतांश भागात पेरण्या झाल्या नसल्याने खरिपाचा हंगाम वाया गेल्याचे चित्र आहे. तसेच ऐन पावसाळ्याच्या दिवसात पावसाने पाठ फिरवल्याने तलाव, ओढे, नाले कोरडेठाक आहेत. मात्र, पुणे परिसरातील धरणात समाधानकारक पाणीसाठा असून मुळा-मुठा नदी आणि खडकवासला कालवा ओसंडून वाहत आहे. त्याद्वारे पुरंदर उपसा सिंचन योजना आणि जनाई-शिरसाई योजनेतून दौंड तालुक्‍यातील कोरडे तलाव भरण्याची मागणी होत आहे.
पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले तरी समाधान कारक पाऊस न झाल्याने बहुतांश भागात खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत. तर काही शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे आणि परिसरातील धरण क्षेत्रात मागील महिन्यात पाऊस पडल्याने धरणातील पाणीसाठा समाधानकारक आहे. त्यामुळे भीमा, मुळा-मुठा नद्या दुतडी भरून वाहत आहेत.
तर खडकवासला धरणाचा मुळा-मुठा कालवा भरून वाहत आहे. यामुळे हवेली, दौंड, इंदापूर या नदीकाठच्या गावांच्या शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळाला आहे. मात्र, दौंड तालुक्‍यातील दक्षिण पट्ट्यातील डोंगराळ भागातील गावांना नदी अथवा कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या भागातील डाळींब, ताम्हाणवाडी, भरगाव, बोरीऐंदी, कासुर्डी, यवत, भांडगाव, खोर, देऊळगावगाडा, पडवी, कुसेगाव, रोटी, जिरेगाव, वासुंदे, हिंगणीगाडा या गावांत दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या गावांचे तलाव, ओढे, नाले पुरंदर उपसा सिंचन योजना आणि जनाई-शिरसाई योजनेतून भरले. तर या गावच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळून लाभ होणार आहे.

  • धरण क्षेत्रात पाऊस समाधानकारक झाल्याने नदीला पाणी मुबलक वाहत आहे. या पाण्याद्वारे पुरंदर उपसा सिंचन योजनेतून डाळींब ते वाखरीपर्यंतचे सर्वच तलाव भरल्यास त्या गावच्या शेतकऱ्यांना आणि गावांना फायदा होईल. अन्यथा, त्या गावच्या नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होऊ शकते.
    – रविंद्र दोरगे, उपसरपंच, भांडगाव, ता. दौंड.
  • पुरंदर उपसा सिंचन योजनेला दौंडच्या दुष्काळी गावांसाठी एक जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, या जलवाहिनीला पाणी सोडण्यासाठी अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी याकडे लक्ष घालून दुष्काळी गावचे तलाव भरल्यास त्या गावच्या नागरिकांना दिलासा मिळेल.
    – एम. जी. शेलार, अध्यक्ष – खुपटेवाडी फाटा, कृती समिती.
  • मागील काळात दुष्काळी भागात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आतापर्यंत पावसानी दडी मारूनही पिण्याच्या पाण्याची समस्या उद्‌भवली नाही. परंतु आता पाण्याची समस्या गंभीर होणार असून शासनाने जर जनाई-शिरसाई योजनेतून पद्मावती तलाव आणि फरतडेवस्ती तलाव भरून दिल्यास पिण्याच्या पाण्याची समस्या सुटून शासनाचे टॅंकरवर होणारे लाखों रुपये वाचतील.
    -ज्ञानेश्वर चौधरी, माजी सरपंच, खोर, ता. दौंड.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)