जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 503 रूग्णांचे फ्ल्यू सर्वेक्षण

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी दिली माहिती

कोल्हापूर – वातावरणात होणारे बदल तसेच दैनंदिन तापमानात आढळून येणारी तफावत यामुळे इन्फ्लूएंझा एएच 1 एन 1 या विषाणूच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी आपल्या राज्यासह शेजारच्या राज्यातही इन्फ्लूएंझाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात जानेवारी 2017 पासून 75 जणांना इन्फ्लूएंझा एएच 1 एन 1 ची लागण झाली असून यामधील 17 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर 9503 रूग्णांचे ए एच 1 एन 1 बाबत सर्वेक्षण झाले आहे. आवश्‍यक असणारा टॅमी फ्ल्यू औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी दिली.

आतापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर 9503 ए एच 1 एन 1 बाबत सर्वेक्षण झाले आहे. फ्ल्यू सर्वेक्षणातून जे रूग्ण आढळतील त्यातील सौम्य स्वरूपाच्या फ्ल्यू रूग्णांना लक्षणानुसार उपचार देण्यात आले आहेत. तसेच मध्यम आणि गंभीर स्वरूपाच्या रूग्णांना त्या-त्या तालुक्‍यात संदर्भित रूग्णालयांकडे पाठविण्यात आले आहे. संदर्भित केलेल्या रूग्णांपैकी जे रूग्ण इन्फ्लूएंझा बाधित आढळले त्यांच्या निकट सहवासितांचा शोध घेऊन फ्ल्यू सदृश्‍य लक्षणे असणाऱ्या निकटसहवासितांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर उपचार देण्यात येत आहेत.

मध्यम आणि गंभीर स्वरूपाचे रूग्ण पुढील उपचारांसाठी निवडक रूग्णालये व सीपीआर हॉस्पिटल येथे संदर्भित करण्यात आले आहेत. इन्फ्लूएंझा बाधितांसाठी सध्या 10 बेड वेगळे ठेवण्यात आले असून 3 व्हेंटीलेटर कार्यरत आहेत. इन्फ्लूएंझा सहित इतर कोणत्याही संसर्गजन्य साथीला प्रभावीपणे तोंड देता यावे यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील 50 आणि 100 खाटांची उपजिल्हा रूग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये रूग्णालये याठिकाणी इन्फ्लूएंझा रूग्णांचे प्रयोगशाळा नमुने संकलन आणि उपचारांची सुविधा निर्माण करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांच्या मार्फत कळविण्यात आले आहे. संशयित इन्फ्लूएंझा रूग्णांचे प्रयोगशाळा नमुने घेणे, बाधित रूगणांवर उपचार करणे आणि गंभीर स्वरूप धारण केलेल्या रूग्णांना तृतीय पातळीवरील रूग्णालयांना संदर्भित करणे ही जबाबदारी जिल्ह्यातील निवडक रूग्णालयांची असल्याचेही जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे.

संशयित रूग्णांच्या घशातील स्त्रावाचा स्वॅब तपासणीसाठी एआयव्ही प्रयोगशाळा पुणेकडे पाठविण्यात येत आहे. तसेच इन्फ्लूएंझा उपचारासाठी निवडण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किमान एक बेडचा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ए एच 1 एन 1 करीता आवश्‍यक असणारा टॅमी फ्ल्यू औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसेच सीपीआरमध्ये लस उपलब्ध असून अतिजोखीमग्रस्तांवर उपचार करणारे कर्मचारी, दीर्घकालीन आजाराचे रूग्ण यांचेसाठी ही लस मोफत उपलब्ध आहे तर इतरांसाठी ऐच्छिक आहे. आतापर्यंत 760 लोकांनी लस टोचून घेतली आहे. क्षेत्रीय पातळीवर इन्फ्लूएंझा प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजना अधिक प्रभावी राबविण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक हे जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक तालुक्‍यात फ्ल्यू सदृश्‍य रूग्णांच्या सर्वेक्षणासाठी तालुका आरोग्य अधिकारी व त्यांच्या अधिनस्त यंत्रणा कार्यरत आहेत. या यंत्रणा इन्फ्लूएंझा सर्वेक्षण, सौम्य फ्ल्यू रूग्णांवर लक्षणांनुसार उपचार आणि निकट सहवासितांचा शोध व उपचार यासाठी कार्यरत आहे. प्रभावी सर्वेक्षणासाठी सामूहिक स्वरूपात आढळलेले श्वसनासंबंधिचे आजार/मृत्यू आणि सामूहिक स्वरूपात आढळलेले फ्ल्यू सदृश्‍य रूग्ण, उद्रेक तसेच अनपेक्षित स्वरूपाचे फ्ल्यू रुग्णांचे अन्वेषण करण्यात येत आहे.

इन्फ्लूएंझा ए एच 1 एन 1 ची प्रमुख लक्षणे सौम्य ताप (38अंश सेंटीग्रेडपेक्षा कमी) खोकला, घसा खवखवणे याशिवाय काही रूग्णांमध्ये अंगदुखी, डोकेदुखी, उलटी व जुलाब अशी लक्षणे असतात. वरील लक्षणांसोबत ज्या रूग्णांमध्ये 38 अंश सेंटीग्रेडपेक्षा जास्त ताप व तीव्र डोकेदुखी आहे अशा मध्यम स्वरूपाच्या रूग्णांना टॅमी फ्ल्यू औषधांच्या उपचाराची आवश्‍यकता आहे. तर वरील लक्षणांसोबत ज्या रूग्णांना श्वासोश्वासाचा त्रास, छातीत दुखणे, थुंकीमध्ये रक्त येणे, रक्तदाब कमी होणे, नखे निळसर होणे, लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा व गुंगी येणे अशी लक्षणे तीव्र स्वरूपाच्या रूग्णांमध्ये आढळतात.

इन्फ्लूएंझा ए एच 1 एन 1 बाबत नागरीकांनी ताप थंडीची लक्षणे दिसू लागताच आरोग्य सेवक, सेविका यांच्याशी संपर्क साधून उपचार सुरू करावेत. बाहेरून घरी आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावा. शिंकताना नाकासमोर रूमाल धरावा. सर्दी किंवा श्वसनाचे विकार झाल्यस डॉक्‍टरांशी त्वरीत संपर्क साधावा. रूग्णांनी पथ्थ्य पाळावीत व औषध घ्यावीत. स्वाईनबाधित परिसरात मास्क अथवा रूमाल लावावा. आवळा, लिंबू, मोसंबी , हिरव्या पालेभाज्या अशा आरोग्यदायी घटकांचा आहारात समावेश करावा. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने योग्य तो उपचार विना विलंब सुरू करावा. फ्ल्यू वरील उपचार 48 तासांच्या आत सुरू झालयास ते गुणकारी ठरतात. फ्ल्यूची लक्षणे दिसताच उपचारास विलंब करू नये. तसेच अवैद्यकीय, घरगुती अथवा गावठी उपचार करू नये. बाहेरून आल्यावर अस्वच्छ हाताने वावरू नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. रूमाल न वापरता शिंकू नये. स्वत:च्या इच्छेने औषध चालू अथवा बंद करू नये. तसेच रूग्णाच्या भेटीस जाताना योग्य ती खबरदारी घेतल्याशिवाय रूग्णाच्या जवळ जाऊ नये. असेही जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)