जिल्ह्यातील 8 लाख 53 हजार 789 मुलांना लस देणार

लसीकरणातून एकही बालक वंचित राहणार नाही यासाठी दक्ष – संजीवराजे नाईक-निंबाळकर

सातारा –
 गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिम आरोग्य विभागामार्फत 27 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. ही मोहिम पाच आठवडे चालणार आहे. या मोहिमेदरम्यान नऊ महिने पूर्ण व 15 वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुला-मुलींना या लसीचा डोस देण्यात येणार आहे. ही लस सर्व खासगी शाळा व शासकीय शाळांमध्ये देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून एकही मुल या लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर बोलत होते. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सुधाकर कोकणे उपस्थित होते.

सुरुवातीला दोन आठवडे ही मोहिम जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. पुढील दोन आठवड्यामध्ये 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील शाळाबाह्य मुले, मुली व शालेय मोहिमेदरम्यान लसीकरण न झालेल्या लाभार्थींना विशेष बाह्य संपर्क सत्रामधुन लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच अति जोखमीच्या भागामध्ये व ऊस तोड कामगारांच्या लाभार्थींनाही फीरत्या पथकाद्वारे लसीकरण करण्यात येणार असल्याचेही जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर यांनी यावेळी सांगितले. 9 महिने ते 15 वर्षापेक्षा कमी वयोगटाच्या मुलांच्या पालकांनी गोवर आणि रुबेला लस आपल्या पाल्यांना द्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकाऱ्यांचे जनतेला आवाहन

9 महिने व 15 वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना गोवर आणि रुबेला लस देण्याची मोहिम 27 नोव्हेंबर पासून ते 4 जानेवारी 2019 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 3 हजार 855 शाळेतील 4 लाख 53 हजार 660 मुलांना तर बाह्य लसीकरणाद्वारे 4 लाख 129 अशा एकूण 8 लाख 53 हजार 789 मुलांना लस देण्यात येणार आहे. यासाठी शाळांमधून 4 हजार 869 लसीकरण सत्र, 3 हजार 113 बाह्यसंपर्क लसीकरण सत्र, संस्थास्तरीय 930 लसीकरण सत्र असे एकूण 9 हजार 130 लसीकरण सत्र घेण्यात येणार असून आपल्या मुलाच्या निरोगी आयुष्यासाठी गोवर आणि रुबेला लस द्यावी. ही मोहिम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)