जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे डिजिटल करणार

राजगुरूनगर- जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र डिजिटल केली जाणार असून या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. खेड तालुक्‍यात आरोग्य विभागाचा 8 कोटी 36 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. खेड तालुक्‍यात कुटुंब नियोजनाचे काम 80 टक्के झाले आहे ते 100 टक्के करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी व्यक्‍त केले.
खेड तालुका आरोग्य विभाग व बांधकाम विभागाची आढावा बैठक बुधवारी (दि. 23) खेड पंचायत समितीमध्ये झाली त्यावेळी डॉ. दिलीप माने बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने, उत्तर पुणे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मैथिली झांजुरणे, सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती अमोल पवार, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, निर्मला पानसरे, बाबाजी काळे, तनुजा घनवट, पंचायत समिती सदस्या ज्योती अरगडे, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेश गोरे, डॉ. उदय पवार यांच्यासह खेड पंचायत समितीच्या बांधकाम व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आशा वर्कर प्रतिनिधी, सेवक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवीण माने म्हणाले की, आशा वर्कर तालुक्‍यात उत्तम आरोग्याचे काम करीत आहेत त्यांना मिळणारा मोबदला अत्यल्प आहे. त्यांना किमान वेतन मिळाले पाहिजे. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे. जिल्ह्यातील जनतेला आरोग्याची शाश्‍वत सेवा कशी देता येईल याकडे कटाक्षाने पहिले जात आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
तनुजा घनवट म्हणाल्या की, वाडा आरोग्य केंद्रात डॉक्‍टर नाहीत. रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.वारंवार सांगूनही तालुका वैद्यकीय अधिकारी येथे लक्ष देत नाहीत. बाबाजी काळे म्हणले की, राजगुरुनगर आरोग्य केंद्राची इमारत नादुरुस्त झाली आहे ती जीर्ण झाल्याने या पावसाळ्यात स्लॅब कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे रुग्णांना धोका निर्माण झाला आहे. ही इमारत दुरुस्त न केल्यास दवाखाना दुसरीकडे सुरक्षितस्थळी हलवावा, अशी मागणी केली. दरम्यान, शेलपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेल्या विविध पुरस्काराबाबत केंद्रातील डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 • अधिकाऱ्यांना शरद बुट्टे पाटलांनी धरले धारेवर
  चाकण उद्योग नगरीत बाहेरच्या राज्यातील नागरिकांची संख्या मोठी आहे. चाकण परिसारातील गावांमध्ये परप्रांतीय नागरिकांचा रहिवास असल्याने ज्या-त्या राज्यातील साथीचे आजार फैलावत आहेत हे टाळण्यासाठी आरोग्य विभागाने जागरूक रहाणे गरजेचे आहे. तालुक्‍यात आरोग्य शिबिरे घेण्यासाठी वेळेत निधी उपलब्ध करावा. पश्‍चिम भागात 108 क्रमांकाची रुग्णवाहिका कार्यरत ठेवावी. करंजविहीरे आरोग्य केंद्रात वेळेवर डॉक्‍टर येत नसल्याने रुग्णाचे हाल होत आहेत. चांगले उपचार मिळत नाहीत. वृद्ध व गर्भवती महिलांचे हाल होत आहे, याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच महाळुंगे आरोग्य केंद्र तत्काळ सुरू करावे, ओपीडी वेळेत सुरू करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी केली.
 • पश्‍चिम भागातील आरोग्य केंद्रात निवासी मेडिकल ऑफिसर असावा. आदिवासी भागातील आरोग्य केंद्राचे डॉक्‍टर तेथे राहत नाहीत आम्ही अनेकदा मागणी केली आहे मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. याकडे वेळीचलक्ष दिले नाही, तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना घेराव घालू. आंबोली आरोग्य केंद्रात डॉक्‍टर नाही. तो न दिल्यास टोकाची भूमिका घेऊ. कुडा आरोग्य केंद्रातील निवासस्थान दुरुस्ती करण्यात यावी.
  – अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य, नायफड-वाशेरे गट
 • आशा वर्करांच्या समस्या
  108 नंबरची रुग्णवाहिका वेळेत येत नाही
  या रुग्णवाहिका चालकांकडून पैसे मागितले जातात
  आधारकार्ड काढण्यासाठी चाकण येथे लहान मुलांना पाठविण्यात येते ते आरोग्य केंद्रात काढून मिळावे अशी सोय करावी
  विविध सर्वेक्षणाचे पैसे वेळेत मिळत नाहीत

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)