जिल्ह्यातील आरटीईचे 72 टक्‍के प्रवेश पूर्ण

12 हजार जणांकडून प्रवेश : चौथी फेरीही काढणार
पुणे- शाळा सुरू होऊन दीड महिना पूर्ण झाला असला तरीही राज्यात आरटीईचे प्रवेश सुरूच आहेत. मात्र मागील अनेक वर्षांचे रेकॉर्ड तोडत यंदा आरटीई प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीपर्यंत पुणे जिल्ह्यातील 72 टक्‍के जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात तिसऱ्या फेरीतील प्रवेश सुरू असून लवकरच चौथी फेरीही काढण्यात येणार आहे. तर, राज्यात तुलनेने कमी म्हणजेच 57 टक्‍के प्रवेश पूर्ण झाले आहेत.
राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू झाल्या आहेत. तर, अनेक सीबीएसईच्या व अन्य बोर्डाच्या शाळा त्याआधीच सुरू झाल्या आहेत. दरवर्षी आरटीईचे प्रवेश लवकर सुरू केले जातील असे आश्‍वासन शिक्षण विभागाकडून दिले जाते मात्र प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू होत नाही. त्यामुळेच अर्थातच प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सप्टेंबर, ऑक्‍टोबर महिना उजाडतो. यंदाही हे चित्र कायम असले तरीही प्रवेशाची आकडेवारी मात्र मागील काही वर्षांच्या तुलनेत आशादायी आहे.
जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी एकूण 930 शाळा असून त्यांतर्गत 16 हजार 306 जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या जागांसाठी 43 हजार 568 अर्ज आतापर्यंत आले असून त्यापैकी 17 हजार 874 जणांना आरटीईअंतर्गत प्रवेश मिळाला मात्र त्यातील 11726 जणांनी आतापर्यंत आरटीईमधून प्रवेश पूर्ण केला आहे. प्रवेशाची प्रक्रिया अजुनही सुरू आहे. तिसऱ्या फेरीतील प्रवेश काही दिवसांतच पूर्ण होणार असून लवकरच चौथी लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरात जवळपास साडेचार हजार जागा उपलब्ध होत्या त्यापैकी 90 टक्‍के जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. ग्रामीण भागांत काही ठिकाणी मात्र शहराच्या तुलनेत कमी प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. चौथ्या फेरीअखेर जिल्ह्यात 75 टक्‍क्‍यांच्या पुढेच प्रवेश होतील असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

आरटीई प्रवेशाची राज्यातील स्थिती
एकूण शाळा – 8,976
एकूण प्रवेश क्षमता – 1,26,185
एकूण अर्ज संख्या – 1,98,966
एकूण प्रवेश पूर्ण – 72,381 (57.36 टक्‍के)


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)