जिल्ह्यातल्या रामांनो वेळीच स्वत:ला आवरा..!

राजकीय अन सामाजिक कारर्किद होईल उध्दवस्त
वैचारिक पातळी ढासळली तर घरीच बसावे लागणार
सम्राट गायकवाड
सातारा,दि.5 – मुलींना पळवून आणण्याच्या बेताल विधानावरून भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर चोहोबाजूने टिकेचा मारा केला जात आहे. राज्यात ठीकठीकाणी आंदोलने होत आहेत. मंत्र्यांना घेराव घातला जात आहे. विधानसभेतून बडतर्फ करण्याची मागणी केली जात आहे. आणि विशेषत: माध्यमांनी देखील कदम जोपर्यंत जाहीर माफी मागणार नाहीत तो पर्यंत चर्चेच्या कार्यक्रमांमध्ये स्थान देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. परिणामी विरोधकांकडून राजकारण होत असल्याचे बोलले जात असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र सोशल मिडीयावर सर्वसामान्य व्यक्ती देखील आ.कदम यांचा निषेध करत आहेत. यावरून हे राज्य पुरोगामी विचारांचे आहे आणि इथे महिलांच्या बाबतीत आमदार असो वा कोणी ही, हे खपवून घेतले जाणार नाही. असा सज्जड इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर आ.राम कदमांप्रमाणे सातारा जिल्ह्यात ही अनेक लोकप्रतिनिधी वाचाळवीर असल्याचे अनेक घटना व कार्यक्रमांमधून दिसून आले आहे. त्यांनी वेळीस स्वत:ला न आवरल्यास आ.कदमांप्रमाणे आपली गत होवू शकते हे आता ओळखायला हवे.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूका आता तोंडावर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे आपसुकच वातावरण आता तापायला सुरूवात झाली आहे. म्हणूनच की काय, आ.कदम यांनी युवकांना प्रभावित करण्यासाठी बेताल वक्तव्य केले असणार. यापुर्वी ही बेताल विधानांमुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ.प्रशांत परिचारक, खा.रावसाहेब दानवे यांच्यासह अनेकांना विरोधकांच्या, नागरिकांच्या अन माध्यमांच्या रोषाला सामोर जावे लागले होते. साहजिकच हे सर्व नेते हेवीवेट असल्यामुळे अन्‌ कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे त्यांच्या विधानांच्या इलेक्‍ट्रॉनिक मिडीयामध्ये ब्रेकींग न्युज, डिबेट शो अन वृत्तपत्रांमध्ये हेडलाईन व अग्रलेखांचे मुद्दे झाले होते. खरे तर अशी विधाने करणारे अनेक वाचाळवीर जिल्ह्यात आहेत. मात्र, केवळ त्यांची वाणी अद्यापपर्यंत कॅमेऱ्यात कैद झालेली नाही हे त्यांचे नशिबच म्हणावे लागेल. परंतु आता बहुतांश नागरिकांच्या हातात स्मार्ट फोन आलेला आहे. त्यामुळे आता यापुढे सद्दविवेक बुध्दीला स्मरूनच विधाने करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर असणार आहे. सार्वजनिक जीवनात वावरतातना एक बेताल विधान आपले विचार सिध्द करतो आणि त्या विचारांचा परिणाम राजकीय आणि सामाजिक कारर्किद उध्दवस्त करू शकतो. हे वेळीच समजून घ्यायला हवे.

खरेतर मागील काही वर्षांपासून राज्याच्या अन्‌ देशाच्या राजकारणात सुशिक्षित, वैचारिक, प्रगल्भ येणाऱ्यांची संख्या घटत आहे. त्याला सातारा जिल्हा देखील अपवाद नाही. सातारा जिल्ह्यात देखील अनेक लोकप्रतिनिधी केवळ संपत्तीच्या जीवावर निवडून आलेले आहेत. त्यांची लाईफस्टाईल, वापरत असलेली वाहने अन्‌ नागरिकांशी बोलण्याची भाषा मिजासीची असते. तसेच खासगी अन्‌ जाहीर कार्यक्रमांमध्ये देखील अश्‍लिल शब्द उच्चारून भाषणे होत असल्याचे दिसून येते. मात्र, येथील जनता व सामाजिक कार्यकर्ते देखील सोशिक आहेत. त्यांना जाब विचारण्याचे धाडस कोणी ही करत नाही ही शोकांतिका आहे. मात्र, अती तिथे माती ही केव्हा न केव्हा होतेच हे आ.कदमांच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी वेळीच बोध घ्यायला हवा. अन्यथा येत्या निवडणुकांमध्ये सोशिक जनतेचा उद्रेक होईल अन मताधिक्‍क्‍य सोडाच, डिपॉझिटच जप्त करायला जनता मागे पुढे पाहणार नाही हे नक्की.

 

प्रश्‍न अन विकासकामांना बगल
देशात, राज्यात अन सातारा जिल्ह्यात देखील प्रामुख्याने मुळ प्रश्‍न व प्रलंबित विकासकामांच्या मुद्दयांवर बोलायला कोणी तयार नाही. लोकशाहीतील मुख्य प्रकिया असलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडून येतात. मात्र, निवडून येताच त्यांचा विचार बदलतो. त्यांनी दिलेल्या आश्‍वासनांच्या अंमलबजावणींवर प्रश्‍न विचारताच दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जातात. हे सध्या आपण जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात पहात आहोत. लोकशाहीनुसार त्यांना सत्तेत जायला हवे. मात्र, मतदारांनी आणि माध्यमांनी त्यांना जाब विचारलेला त्यांना आवडत नाही. परंतु काळ बदलतोय ज्या पध्दतीने आ.राम कदमांवर विधानांच्या निमित्ताने टिका होत आहे त्याच प्रकारे लोकप्रतिनिधींच्या परफॉर्मन्सवर देखील प्रश्‍न उपस्थित होणार आहेत आणि त्यासाठी विशेषत: सोशल मिडीयाचा प्रभावी वापर होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)