जिल्ह्याचे आरटीई प्रवेश आज अखेर संपणार

जिल्ह्यात सत्तर टक्‍के प्रवेश: यंदा शांततेत प्रवेश प्रक्रिया

पुणे – शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या 25 टक्‍के राखीव प्रवेश आता ऑगस्ट अखेर संपणार आहेत. तब्बल आठ फेऱ्या घेतल्यानंतर याबाबचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 ऑगस्टपर्यंत पालकांनी आठव्या फेरींतर्गत वाटप झालेल्या शाळांमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यासाठी तरी नवी फेरी घेण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. यंदा एकूणच प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडली असून तब्बल सत्तर टक्‍के प्रवेश झाले आहेत.

आरटीई अंतर्गत पुण्यात 849 शाळांसाठी 15 हजार 693 जागा उपलब्ध होत्या. तर त्यासाठी 39 हजार 248 अर्ज आले होते. त्यापैकी 30 ऑगस्टपर्यंत 10 हजार 964 शाळांमध्ये प्रवेश झाल्याचे सध्या दिसत आहे. तर अन्य जिल्ह्यामध्येही जवळपास फेऱ्या संपत आल्या असून त्या त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्या सुरु ठेवायच्या की नाही याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

यंदा पहिल्यांदा इतक्‍या मोठ्या प्रमाणात प्रवेशासाठी अर्ज आले होते. मागील काही वर्षात आरटीई प्रवेशाचा गोंधळ पहाता यंदाची प्रवेश प्रक्रिया तुनलेने सुरळीत पार पडली असून प्रवेशाची टक्‍केवारीही पहिल्यांदा 70 टक्‍क्‍यांपर्यंत गेली आहे. मात्र अद्यापही ज्या प्रमाणात याची जनजागृती होणे अपेक्षित आहे ती झालेली दिसत नाही. तत्कालीन शिक्षणाधिकारी मुश्‍ताक शेख, शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, शिक्षण मंडळाच्या वैशाली पांढरे व गीता जोशी आदींचा ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात वाटा आहे. आम आदमी पक्ष, कागद काच पत्रा सारख्या संघटनांनी अभ्यासपूर्ण तक्रारी सांगत त्याचे निराकरण करुन घेतल्याने यंदा अनेक तांत्रिक मुद्दयांवर कमी प्रमाणात गोंधळ पहायला मिळाला.

शुल्क परतावा दोन वर्ष वगळून?
आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडली असली तरी शिक्षण विभागासमोर आता शुल्क परताव्याचा प्रश्‍न येऊन उभा ठाकला आहे. शिक्षण विभागाने 2014-15 व 2015-16 या दोन वर्षांतील आरटीई प्रवेशाचा परतावा वगळून थेट 2017-18 चा निधी वर्ग केल्याने आता शिक्षण संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. तर शिक्षण उपसंचालकांनाही याचे वाटप कसे करावे असा प्रश्‍न पडल्याने याबाबत पुन्हा शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत प्रवेश जरी सुरळीत पार पडलेले असले तरीही शुल्क परतावा रखडणार असल्याचे दिसते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)