जिल्हा रुग्णालयाला भुरट्या समाजसेवकांचा विळखा

 चिरिमिरी घेउन मोफत उपचारांचा होलसेल धंदा 
संदीप राक्षे 
सातारा- सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्यांसाठी मोफत उपचारासाठी लाईफ लाईन असणारे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय भुरट्या समाजसेवकांच्या कारनाम्यामुळे चर्चेत आहे. शंभर पाचशेच्या चिरिमिरीत दारिद्रय रेषेखालील रुग्णांकडून शासकीय मोफत उपचारांचा होलसेल धंदा तेजीत आला आहे. अशा नतद्रष्ट दलालांना प्रशासनातील कर्मचारी सामील असल्याने उपचारांच्या नावाखाली रुग्णांची लूट सुरू आहे. जिल्हा रुग्णालयाचा कारभार सतत या ना त्या कारणाने कायम चर्चेत असतो याचे कारण येथील काही झारीतील शुक्राचार्य त्यांना सामील असलेले दलाल यांच्याकडून सर्वसामान्य रुग्णांना नाडण्याचे प्रकार सर्रास सुरु असतात.
साधारण पंधरा प्रकारच्या आजारांना जिल्हा रुग्णालयात दारिद्रय रेषेखालील रुग्णांना राजीव गांधी जीवनदायिनी योजनेअंर्तगत मोफत उपचार दिले जातात. यासाठी रुग्णांचा फोटो पिवळे रेशनकार्ड आधार कार्ड क्रमांक डॉक्‍टरची शिफारस केसपेपर अशा कागदपत्रांची आवश्‍यकता असते. मात्र त्यावर जिल्हा रुग्णालयातील शिक्‍क्‍यांची गरज असते. शिक्‍का आणि सही याकरिता गरीब रुग्णांकडून पाचशे ते हजार रुपयांच्या दरम्यान काम करणारी बोगस समाजसेवकांची टोळीच रुग्णालयात सक्रीय असल्याने जिल्हयाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांना पध्दतशीरपणे नाडले जाते. रुग्णालयात दिवसाला शंभर ते सव्वाशे रुग्णांचा डिस्चार्ज होतो मात्र तो घेताना काही कागदपत्रांची पूर्तता तसेच मोफत उपचारांसाठी वैयक्तिक माहितीचे पुरावे छायांकित प्रतीत सादर करावे लागतात. मात्र याच कागदपत्रांच्या क्‍लिष्टतेचे बागुलबुवा उभा करून काही दलाल रुग्णालयातील काही ठराविक जणांकडे पोहोचून त्यावर शिक्का मारून घेतात. मात्र काही शिक्‍के आणि सह्यांची किंमत पाचशे ते हजार रूपयांच्या दरम्यान असतो. त्यामुळे दिवसाला दहा हजार रुपयांचे उखळ पांढरे करणारे दलाल सामान्यांच्या खिशाला चाट देतात.
रुग्णांना लुटणाऱ्या दलालांना आवरा जिल्हा रुग्णालयाचा कारभार जिल्हा शल्यचिकित्सक चालवतात की झारीतले शुक्राचार्य हे कधीच समजून आलेले नाही. डॉ. श्रीकांत भोई यांच्या काळात या दलालांची मुजोरी फारच वाढली होती. अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार योग्य ती दलाली घेऊन सोयीस्कर प्रमाणपत्र देणाऱ्या महाभागांचा रुग्णालयात वावर असतो. अगदी जिल्हा परिषदेच्या घोळात अडकलेल्या शिक्षक बदल्यांमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्रे सरकारी आशीर्वादाने याच शुक्राचार्यांनी दिली होती अशी खाजगीमध्ये खसखसं आहे. आता डॉ आमोद गदीकर यांच्या राज्यात तरी गरीबांना न्याय मिळणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
पारदर्शी प्रशासनाची आवश्‍यकता. 
जिल्हा रुग्णालयात सुविधा आणि मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे. याशिवाय प्रत्येक विभागातील सुप्त दलालीचा चाललेला खेळ ताबडतोब थांबवण्याची गरज आहे. डॉ. आमोद गडी कर यांनी मावळ तालुक्‍यात आपल्या कामाची चांगलीच छाप उठवली आहे. रुग्णालयाच्या आवारात विनाकारण रेंगाळणाऱ्या बिनकामाच्या समाजसेवकांना चाप लावण्याचे आव्हान नव्या जिल्हा शल्यचिकित्सकांसमोर आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)