सर्वांधिक बदल्यांची संख्या आरोग्य आणि सामान्य प्रशासन विभागातील

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.22 – जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील वर्ग तीन कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रक्रिया समुपदेशनाने आणि शांततेत पार पडल्या. त्यामध्ये सर्व विभागांतील एकूण 274 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाकडून देण्यात आली.

राज्य शासन ग्रामविकास विभागाकडील बदल्यांबाबत असलेल्या धोरणानुसार बदल्या कराण्याबाबतचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले होते. त्यामुळे वशिलेबाजीला थारा मिळणार नसून, बदली प्रक्रिया समुपदेशनाने केल्यामुळे सर्व बदली प्रक्रिया शांततेत पार पडली आणि कर्मचाऱ्यांमध्येही समाधानाची भावना असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने बदल्यांच्या समुपदेशनाचे वेळापत्रक तयार केले होते. त्यानुसार दि. 11 मेपासून विभागवार बदल्यांना सुरुवात झाली. त्यातील सर्वाधिक बदल्यांची संख्या आरोग्य विभाग आणि सामान्य प्रशासन विभागातील होती. आरोग्य विभागातील 112 तर सामान्य प्रशासन विभागातील 69 कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तसेच ग्रामपंचायत विभागातील 41, वित्त विभागातील 6, महिला व बालकल्याण 7, कृषी विभागातील 2, पशुसंवर्धन विभागातील 19 आणि शिक्षण विभागातील 11 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अशा एकूण 274 कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत; तर ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवक, विस्तार अधिकारी आणि ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिक्षक, पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक, आरोग्य विभागातील आरोग्य सेवक तसेच महिला बालकल्याणमधील अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

सर्वसाधारण बदल्या या समुपदेशाने होतील. बदल्या करताना कोणत्या गोष्टी प्रामुख्याने पाहावे याच्या सुचना संबंधित विभागप्रमुखांना दिल्या होत्या, त्याप्रमाणे सर्व बदल्या सूरळीत झाल्या आहेत. बदल्यांमध्ये सुसूत्रता असेल, कर्मचाऱ्यांची क्षमता ओळखून कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आल्या आहेत.
– सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)