जिल्हा परिषद उभारणार क्रीडा प्रबोधिनी

दोन कोटींची तरतूद : कोल्हापूरच्या धर्तीवर उपक्रम

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 25 – विविध खेळांमध्ये तरबेज असलेल्या ग्रामीण भागातील मुला-मुलींना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे ते पुढे जात नाही. मात्र, आता क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने क्रीडा प्रबोधिनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने यंदाच्या अंदाजपत्रकात प्रबोधिनीसाठी दोन कोटींची तरतूद केली आहे.

कोल्हापूरमध्ये उभारण्यात आलेल्या प्रबोधिनीच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यामध्ये ही क्रीडा प्रबोधिनी उभारण्यात येणार असून, एका वर्षातही ही सुविधा उभारण्याचा मानस असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यातील विविध भागांमधील विद्यार्थी कबड्डी, क्रिकेट, खो – खो, तिरंदाजी, गोळाफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, कुस्ती अशा विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळविताना दिसतात. मात्र, त्यांचे या खेळांतील प्राविण्य आणि खेळातील सातत्य हे फक्त शालेय जिवनापुरतेच मर्यादित राहत आहेत. या खेळाडूंना खेळांमध्ये योग्य मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण मिळत नसल्याने खेडाळू अर्ध्यावरच खेळ सोडत असल्याचे निदर्शनात आले आहे. ऑल्मिपिकमध्ये ज्या वेळी चीन शंभर पदके पटकावितो, तेंव्हा भारताला एखादे पद मिळते. ही परिस्थिती ग्रामीण भागांतील खेळाडूंकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळावे त्याचबरोबरच त्यांचे शिक्षणही पूर्ण व्हावे, यासाठी जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनी उभाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले. पुणे शहराच्या लगतच्या परिसरामध्ये 10 ते 15 एकर जागेत ही प्रबोधिनी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागेचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ऑल्मिपिकमध्ये समाविष्ट सर्व क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे. तसेच प्रबोधिनीमध्ये निवासी शाळाही असणार आहे, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)