पुणे – जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना स्वच्छ, सुंदर आणि सुस्थितीत असलेल्या वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेता यावे. यासाठी मोडकळीस आलेल्या शाळांची दुरूस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेने ठोस पाऊल उचलले आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या शाळा त्वरीत दुरूस्त करण्याचा कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे वर्गखोल्या चांगल्या तयार होणार असून, विद्यार्थ्यांनाही प्रसन्नपणे खोल्यांमध्ये बसून शिक्षण घेता येणार आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा दुरूस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी 2 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मिळतो. मात्र, यंदा जिल्हा नियोजन समितीकडून 9 कोटी 52 लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून 352 शाळांची दुरुस्ती केली जाणार आहे.
-विवेक वळसे-पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद
जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटले की, त्या मोडकळीस आलेल्या, विद्यार्थ्यांना नेहमी मैदानावर बसावे लागते अशी परिस्थिती असते. मात्र, ही ओळख पुसून टाकण्यासाठी जिल्हा परिषदेने यंदाच्या अंदाजपत्रात शाळांच्या दुरूस्तीसाठी भरीव निधी दिला आहे. काही महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत पडल्यामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने खबरदारी घेत जिल्ह्यातील सर्व शाळांचा अहवाल मागविला होता.
त्यानुसार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील शाळांच्या दुरूस्तीसाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निधीसाठी वेळोवेळी पाठपूरावा केला. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांची दुरावस्था झाली असून, उन्हाळा अथवा पावसाळ्यात वादळ वाऱ्यात शाळांचे पत्रे उडून जाणे, भिंती पडणे आदी घटना घडतात. त्यामुळे जिल्हा परिषदेने वेळीच याबाबतची काळजी घेतली आहे. जिल्ह्यातील बहुतांश शाळांची उभारणी झाल्यापासून दुरुस्तीसाठी अजून निधी उपलब्ध झाला नव्हता. मात्र, आता निधी उपलब्ध झाल्यामुळे शाळांची डागडूजी करता येणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा