जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील तब्बल 45 कोटींचा निधी अखर्चित

जिल्हा परिषदेच्या तब्बल 45 कोटींचा निधी अखर्चित

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 13 – निधी कमी पडत असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक विकासकामांना कात्री लावली जाते. तर दुसरीकडे मागील चार वर्षात जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील मिळून तब्बल 45 कोटी रूपयांचा निधी खर्चच झाला नसल्याची धक्कादायक बाब स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आली आहे. हा निधी का राहिला याचा अहवाल त्वरीत द्यावा, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, अखर्चित निधीचा आकडा एकताच सर्व सदस्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते.

जिल्ह्यातील सर्व गावांचा विकास करण्यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेला भरघोस निधी येतो. दिलेल्या निधी वेळेत खर्च झाली नाही तर तो पुन्हा मागविला जातो. त्यानुसार प्रधान सचिवांनी 2012 ते 2016 दरम्यान शासननिधीतील अखर्चित रकमेची माहिती जिल्हा परिषदेकडून मागितली होती. त्याबाबत भाजपाचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर ही धक्कादायक बाब समोर आली. दरम्यान, जिल्हा परिषदेने विविध विषयांसाठी मंजूर केलेल्या रकमा ह्या दोन वर्षांपर्यंत वापरता येतात. त्यानंतर तो निधी परत जातो. त्यामुळे आज 45 कोटींचा निधी पुन्हा जाण्याच्या मार्गावर आहे. यावेळी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी एवढा निधी राहिला कशा, जिल्ह्यात एवढी विकासकामे बाकी असताना निधी राहतोच कशा असा जाब विचारला असता, प्रशासनाकडून जिल्हा परिषदेकडे मनुष्यबळ कमी असल्याचे कारण पुढे करण्यात आले. मात्र, सध्य स्थितीत कर्मचाऱ्यांची संख्या पाहता ती पुरेशी असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

अधिकाऱ्यांनी मनुष्यबळ कमी असल्याचे सांगितल्यावर अध्यक्षांनी कंत्राटी पध्दतीवर अभियंत्यांची भरती करा असे सांगितले. तसेच यापुढे अखर्चित निधी राहणार नाही याची काळजी घ्या, अशा सुचना दिल्या. मात्र यापुर्वीच 8 कंत्राटी अभियंत्यांची भरती जिल्हा परिषदेने केली आहे. त्यांना प्रत्येकी 35 हजार रुपये पगार दिला जात आहे. त्या तुलनेत काम नाही. असा प्रश्नही स्थायीच्या सदस्यांनी उपस्थित केला. सध्या जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानांतर्गत 69 शाळांची कामे सुरु आहेत. एकीकडे 45 कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहतोय, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेकडे मनुष्यबळ कमी असल्याचे कारण दिले जात आहे. या मुद्यावरुन पदाधिकारी व स्थायी समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली व अध्यक्षांनी आगामी काळात जिल्हा परिषदेचा निधी अखर्चित राहू नये अशा सुचना दिल्या.

चौकट-
याविभागातील निधी अखर्चित
ग्रामपंचायत विभागातील 9 कोटी रुपये, समाजकल्याण विभाग 4 कोटी, आरोग्य विभाग 8 कोटी, शिक्षण विभाग 5 कोटी, बांधकाम विभाग 7 कोटी, छोटा पाटबंधारे विभाग 7 कोटी, पशुसंवर्धन विभाग 2 कोटी आणि पाणीपुरवठा व महिला बालकल्याण विभागातील काहीसा निधी अखर्चित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)