विवेक वळसे पाटील यांचे आश्वासन
मंचर- ग्रामीण भागातील खेळाडु क्रीडा क्षेत्रात चमकदारी कामगिरी करीत असतात; परंतु त्यांना दिशा मिळत नाही. विविध क्रीडा प्रकांराना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने आवश्यक ती उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिले.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व पुणे जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या वतीने मंचर येथील रामनगरी मैदानावर 46वी कुमार गट मुले-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे उद्घाटन पराग मिल्कचे संचालक प्रितम शहा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, खो-खो असोसिएशनचे सचिव संदीप तावडे, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, लक्ष्मण थोरात भक्ते, ऍड. बाळासाहेब पोखरकर, अनिल चोरमोले, विजय संतान, सचिन गोडबोले, गोविंद शर्मा, संदीप चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी क्रीडाज्योतीचे मोठ्या दिमाखात आगमन झाले. मान्यवरांनी क्रीडाज्योतीचा स्वीकार केला. स्पर्धेच्या संयोजन समितीचे कार्याध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम म्हणाले की, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील खेळाडूंना चांगल्या दर्जाचा खेळ पाहता यावा व त्यातून नवोदित खेळाडू घडावेत या भावनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत 22 मुलांचे तसेच 21 मुलींचे असे एकुण 43 संघ सहभागी झाले आहेत. एकुण 516 खेळाडु आहेत. स्पर्धेसाठी 30 राज्यस्तरीय पंचाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 20 पदाधिकारी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ मंचरचे माजी अध्यक्ष प्रशांत अंभंग यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कडलग यांनी केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा