जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरावी

बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांची मागणी

जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे दिले निवेदन

प्रभात वृत्तसेवा

पुणे, दि. 31 (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होत असल्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी अशी मागणी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत प्रवीण माने यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

जिल्ह्यातील 13 तालुक्‍यांमध्ये 96 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 539 उपकेंद्र आहेत. अनेक ठिकाणी आरोग्य सेवक महिला व पुरूष, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मिळून 585 रिक्त पदे आहेत. त्यामुळे रूग्णांना आरोग्य सेवा मिळत नसल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. ही पदे तातडीने भरल्यास जिल्ह्यातील रूग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यास मदत होईल. दरम्यान अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यावतीने काढलेल्या आदेशामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रिक्त 585 पदे भरण्याची मागणी माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

जिल्ह्यात रिक्त पदामध्ये आरोग्य सेवक महिला 350, आरोग्य पुरूष कर्मचारी 221, औषध निर्माण अधिकारी 12, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 2 मिळून 585 जागा भरावयाच्या आहेत. रिक्त पदाची भरती प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मान्यता देण्यात येणार आहे. दरम्यान, शासनाकडून अद्यापही वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे भरती करण्यासाठी आरक्षण निश्‍चीत केले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 13 तालुक्‍यांमधील 96 प्राथमिक आरोग्य केंद्रात सद्यस्थितीत वैद्यकीय रिक्त 45 पदे, जिल्हा शल्य चिकित्सक 22 पदे मिळून 67 पदाच्या आरक्षण निश्‍चीसाठी तातडीने रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)