जिल्हा चळवळींचा ‘बालेकिल्ला’ 

महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकारी चळवळीतील महत्त्वाचा जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याकडे पाहिले जाते. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देण्याचे मोलाचे काम नगर जिल्ह्यातील सर्व चळवळींनी केले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जिल्ह्यातील कोणत्याही बऱ्या-वाईट घटनांचे दुरगामी परिणाम महाराष्ट्रातील समाजकारणावर, राजकारणावर होत असतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जिल्ह्याला सामाजिक चळवळींचा एक देदीप्यमान इतिहास आहे. या जिल्ह्याला चळवळीची एक वेगळीच किनार असल्यामुळे जिल्ह्याची चळवळींचा बालेकिल्ला म्हणून ऐतिहासिक ओळख आहे. म्हणूनच जिल्हा हा पुरोगामी व विचारांच्या चळवळीचा जिल्हा म्हणून राज्यात सर्वश्रृत आहे. याच देदीप्यमान ऐतिहासिक वलयामुळे राज्याचे समाजकारण, राजकारण सातत्याने जिल्ह्याभोवती फिरत असते. 

जिल्ह्यामध्ये पूर्वीपासूनच वेगवेगळ्या चळवळी कार्यरत आहेत. सहकार, शैक्षणिक, सामाजिक चळवळी जिल्ह्यात पूर्वीपासून आजतागायत अग्रेसर आहेत. सहकार चळवळीतील साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणीसारख्या छोट्या गावातून सुरू केली. आशिया खंडातील पहिला साखर कारखाना 1949 मध्ये या नगर जिल्ह्याच्या भूमीत सुरू करण्यात आला ही निश्‍चितच जिल्ह्यासाठी भूषणावह बाब म्हणता येईल. सहकाराच्या चळवळीच्या पुढे जात शैक्षणिक चळवळीमध्ये विखे पाटलांच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थेची स्थापना जिल्ह्यात होऊन ग्रामीण भागातील अनेक तरुण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. संगमनेर तालुक्‍यात सहकारमहर्षी कै. भाऊसाहेब थोरात यांनी सहकारी चळवळीत काम करून वृक्ष ही काळाची गरज लक्षात घेत पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी व वृक्षसंवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दंडकारण्य चळवळीचे केलेले संगोपन जिल्ह्याने पाहिलेले आहे.

जिल्हा हा तसा कम्युनिस्ट विचारसरणीचा जिल्हा म्हणून डाव्या विचारसरणीचा प्रभाव नेहमीच जिल्ह्यावर राहिलेला आहे. 1956 सालापासून लाल निशाण पक्षाच्या माध्यमातून कॉ. बापूसाहेब भापकर, कॉ. दत्ता देशमुख, कॉ. भाई सथ्था, कॉ. गवळी, कॉ. नागवडे, माजी आमदार कॉ. पी. बी. कडू पाटील, कॉ. भास्कर जाधव, कॉ. मधुकर कात्रे, कॉ. भी. र. बावके यांनी कष्टकरी, कामगार, स्वातंत्र्यानंतर कामगारांच्या प्रश्‍नांवर व शोषणाविरूध्द, पाणी प्रश्‍नावर, रोजगार हमीच्या कामाविषयी शेतमजुरांचे संघटन, मैल कामगारांचे संघटन, कोतवालांचे संघटन, सायकल, एसटी असा प्रवास करून संघटन करत प्रस्थापित शोषण व्यवस्थेविरूध्द लढे उभारण्याचे मोठे कार्य कम्युनिस्ट चळवळीने लाल निशाण पक्ष (लेनिन) यांनी केले. त्यांनी कलापथके, शाहिरी पथकांच्या माध्यमातून कष्टकरी, शेतकरी, कामगाराचे संघटन या जिल्ह्यात उभे केले. 1973 साली 17 लाख शेतमजुरांनी रोजगार हमी कायदा लागू व्हावा यासाठी केलेले लाक्षणिक उपोषण याच जिल्ह्यात घडलेले आहे. आताच्या काळामध्ये शहरातील महापालिकेत कॉ. अनंत लोखंडे यांच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्‍नावर आजही मोर्चे, लढे उभे केले जात आहेत. हे केवळ चळवळीच्या विचारांमुळेच.

दरम्यानच्या काळात 1978 च्या काळामध्ये डॉ. कुमार सप्तर्षींनी बहुजन समाजाला संघटित करून जिल्ह्यामध्ये बहुजन चळवळीचे मोलाचे काम केलेले आहे. याच कालखंडात विडी कामगारांच्या प्रश्‍नांवर कॉ. राम रत्नाकर, कॉ. अंकाराम, कॉ. मल्लेश्‍याम येमूल व आतापर्यंत कॉ. शंकर न्यालपेल्ली यांनी मोठे लढे उभारून विडी कामगारांसाठी मोठे योगदान दिलेले आहे. नंतरच्या काळात शहरामध्ये मापाडी कामगारांच्या प्रश्‍नांवर साधारणपणे 80 च्या दशकामध्ये माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले (अण्णा) यांनी मापाडी कामगारांच्या प्रश्‍नांवर हमाल पंचायतीच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते कॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली मापाड्यांना, हमालांना न्याय देण्यासाठी मोर्चे, आंदोलनाचे लढे उभारून न्याय मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष जिल्ह्याला सर्वश्रृत आहे. या संघर्षामध्ये कै. लक्ष्मण तात्या वाडेकर यांचाही महत्त्वाचा सहभाग होता.

आज मापाडी कामगार व हमालांच्या प्रश्‍नांसाठी कै. शंकरराव घुले यांचे बंधू अविनाश तात्या घुले मापाड्यांची चळवळ सांभाळत आहेत. याच कालखंडात किंबहुना त्याही अगोदर फुले, शाहू, आंबेडकरांची सामाजिक चळवळ ही जिल्ह्यात गाजत होती. चळवळीत सुरुवातीच्या काळात सामाजिक प्रश्‍नावर गोरगरीब कष्टकरी, मजूर, दलित, मागासवर्गीयांना न्याय देण्यासाठी दलित पॅंथरच्या माध्यमातून संस्थापक नामदेव ढसाळ यांनी जिल्ह्यातील त्यावेळेचे नीलक्रांती चौकातील विजयकांत चाबुकस्वार, अकोल्यातील विजय वाकचौरे, महेंद्र त्रिभुवन, कर्जत येथील माजी आमदार विठ्ठलराव भैलुमे, आबा विभुते, कालकथित भैय्यासाहेब गायकवाड, यांनी दलित पॅंथरच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीचे संघटन करून सामाजिक लढे उभारले.

आताच्या काळामध्ये अशोक गायकवाड, प्रा. जयंत गायकवाड, माजी नगरसेवक अजय साळवे, विजय भांबळ, सुनील क्षेत्रे, नितीन कसबेकर, सुनील शिंदे याच कालखंडामध्ये ओबीसी समाजाचे संघटन करून ओबीसी चळवळ, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळ राज्यात पोहचविण्याचे मोलाचे कार्य याच जिल्ह्यातील अशोक सोनवणे यांनी केले. 27 जुलै 1977 च्या अगोदरपासून राज्यभर औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठास डॉ. आंबेडकरांचे नाव द्यावे, या मागणीसाठी राज्यभर आंबेडकरी चळवळीने लढा उभारलेला असतानाच शहरासह जिल्ह्यातील चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यांना विसापूर येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. आजही जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचा इतिहास अजरामरच आहे. फाशीपारधी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून गुन्हेगारी प्रवृत्तीपासून प्ररावृत्त करण्यासाठी पालावर राहणाऱ्या या समाजाला संघटित करण्यासाठी राजेंद्र काळे, प्रा. किसन चव्हाण, अरुण जाधव हे भटक्‍या विमुक्तांच्या प्रश्‍नांवर चळवळीच्या माध्यमातून संघर्ष करीत आहेत.

एकंदरीतच जिल्ह्याच्या ऐतिहासिक व देदीप्यमान चळवळींचे सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम राज्याच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक चळवळीवर दूरगामी परिणाम होऊन राज्याला दिशा देण्याचे काम जिल्ह्याने नेहमीच केलेले आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने निश्‍चितच अभिमानाची बाब असून, चळवळीच्या या जिल्ह्यात सर्व चळवळींना योग्य दिशा मिळून ही चळवळ अशीच बळकट व्हावी, हीच अभिलाषा. आदर्शगाव हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांनी त्यांच्या गावात जलसंधारणच्या कामाचे योग्य नियोजन करून पाणी वाचवून संवर्धन करण्याची चळवळ उभारली. ती जिल्ह्यापुरतीच न राहता परराज्यातून या चळवळीचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी व तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्या जिल्ह्याला भेटी देतात. ही जिल्ह्याच्या दृष्टीने गौरवास्पद बाब आहे. 32 वर्षांपूर्वी देशात पहिल्यांदाच “स्त्रीजन्माचे स्वागत करा’, “बेटी बचाव’ या चळवळीची सुरुवात सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुधा कांकरिया यांनी जिल्ह्यात केली. परराज्यातच नव्हे तर विदेशातही ही चळवळ प्रसिध्द झाली असून, कॅलिफोर्निया येथील रेडिओने याबाबतीत त्यांची मुलाखत प्रसारित केली. या चळवळीमध्ये नगर जिल्ह्याचे नाव परराज्यात नव्हे तर विदेशातही झळकणे ही जिल्ह्यासाठी अत्यंत नावलौकिकाची बाब आहे.

 

 

– महेश भोसले
शहर प्रतिनिधी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)