जिल्हास्तरीय महिला निवड चाचणी बुद्धिबळ : स्नेहल, आर्या, गायत्री संयुक्‍त आघाडीवर 

पुणे – स्नेहल महाजन, आर्या पिसे व गायत्री परदेशी या तीन खेळाडूंनी पाचव्या फेरीअखेर प्रत्येकी 4.5 गुणांची कमाई करताना येथे सुरू असलेल्या पुणे जिल्हा महिलांच्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेचा आजचा दिवस गाजविला. पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेली ही स्पर्धा जोसेफ डिसूझो चेस अकादमी येथे सुरू आहे.
स्नेहल महाजन विरुद्ध गायत्री परदेशी ही लढत पाचव्या फेरीचे खास आकर्षण होती. पहिल्या पटावरील या डावांत स्नेहल महाजनने वजिरासमोरील प्याद्याने प्रारंभ केला. तर काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या गायत्रीने ग्रुनफील्ड बचावाने तिला उत्तर दिले. डावाच्या मध्यापर्यंत स्थिती समसमान होती. डावाच्या उत्तरार्धात स्नेहलने गायत्रीपेक्षा एक प्यादे अधिक मिळविले व डावावर वर्चस्व घेण्याचा प्रयत्न केला. परंतु गायत्रीने लवकरच ते प्यादे परत मिळविले व डाव बरोबरीत आणला. अखेर 46व्या चालीनंतर दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली.

आजच्या अन्य सामन्यांमध्ये आर्या पिसेने तेजस्विनी नांगरेचा निर्णायक पराभव करीत आघाडीवर झेप घेतली. तर रिया मराठेने मृण्मयी बागवेवर आणि निसर्गा पालकरने श्रुती वाळुंजवर संघर्षपूर्ण मात करताना प्रत्येकी 4 गुणांसह संयुक्‍त दुसऱ्या स्थानाची निश्‍चिती केली. सानिया सापळेने दिया कंटकचा सहज पराभव केला. तर आणखी एका लढतीत श्रावणी अंबावालेने श्रावणी गोडबोलेवर मात करीत संयुक्‍त तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. आजच्या दिवसातील उरलेल्या दोन लढतींपैकी पहिल्या सामन्यांत यज्ञा चौधरीने कोमल गोरेला पराभूत केले. तसेच तन्वी कुलकर्णीने ईश्‍वरी गोसावीला पराभूत करताना स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. या स्पर्धेतून राज्य मानांकन स्पर्धेसाठी पुणे जिल्हा महिला संघाची निवड करण्यात येणार असून जिल्ह्यातील एकूण 36 महिला खेळाडूंनी स्पर्धेला प्रतिसाद दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)