जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पुण्यात रंगणार

संग्रहित छायाचित्र

पुणे –  सोमणस्‌ हेल्थ क्‍लबतर्फे कै. स्वप्निल जयंत सोमण यांच्या जन्मस्मृती दिनानिमित्त पुणे जिल्हा ऍमॅच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने उद्या (रविवार) जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष आणि महिलांच्या ज्युनियर, सीनियर आणि मास्टर या गटात स्पर्धा होणार आहेत. येत्या एक ते तीन जून दरम्यान सिंधुदुर्ग, कुडाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघाची निवड या स्पर्धेतून करण्यात येणार आहे.

बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. प्रशालेत ही स्पर्धा रंगणार असल्याची माहिती सोमणस्‌ हेल्थ क्‍लबचे प्रमुख राजहंस मेहेंदळे यांनी दिली. स्पर्धेचे उद्‌घाटन नू. म.वि. प्रशालेच्या मुख्याध्यापिका संजिवनी ओमासे आणि गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई उपस्थित राहणार आहेत. पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड, वडगाव मावळ या ठिकाणाहून 60 पेक्षा अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

सोमणस्‌ हेल्थ क्‍लब, शिवदुर्ग व्यायामशाळा, मल्टिफिट, महाराष्ट्र स्पोर्टस्‌ क्‍लब, फिशर क्‍लब, आझम स्पोर्टस्‌ क्‍लब यासोबतच पुण्यातील विविध व्यायामशाळेच्या स्पर्धकांनीही आपला सहभाग निश्‍चित केला आहे. स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष आहे. राजहंस मेहेंदळे म्हणाले की, महिला गटात 43 ते 85 किलो दरम्यानचे वजनी गट तर पुरुष गटात 53 पासून 120 किलोवरील या दरम्यानच्या वजनीगटांचा समावेश आहे.सर्व वयोगट आणि वजनीगटात स्क्‍वॉट, बेंच प्रेस आणि डेड लिफ्ट या प्रकारात मिळून जास्तीत जास्त वजने उचलणारे खेळाडू सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकाचे मानकरी ठरणार आहेत.

याबरोबरच बेहमन फिशर स्ट्रॉंग वूमन आणि बेहमन फिशर स्ट्रॉंग मॅन हे किताब देखील दिले जाणार आहेत. मिळालेली एकूण पदके आणि एकूण गुणांनुसार विजेत्या संघास ट्रॉफी देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)