जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर लोकसहभागातून मोर्णा नदीची स्वच्छता

लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिकांचा सहभाग

अकोला – अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला आता लोकचळवळीचे स्वरुप मिळाले आहे. त्यानुसार आजही हजारो लोकांनी आज स्वच्छतेच्या या महायज्ञेत आपला सहभाग नोंदवला.

आज सकाळी मोर्णाच्या स्वच्छतेला प्रारंभ झाला. गीतानगर भागाला लागून असणाऱ्या मोर्णाच्या पूर्व व पश्‍चिम भागात शनिवारी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी जेसीबीद्वारे काढण्यात आलेला कचरा लोकांनी वाहनांमध्ये भरुन दिला. तसेच नदीपात्रात उतरुन शेकडो लोकांनी सांघिकरित्या कचरा बाहेर काढला.

नदीच्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छतेसाठी करायच्या कामांचे नियोजन जिल्हा प्रशासन आणि मनपा व पोलीस प्रशासनाने केले होते. त्यामुळे सहभागी सर्वांनीच कुठलीही भीती न बाळगता स्वयंस्फुर्तीने नदी काठावरील कचरा हिरीरीने ट्रॅक्‍टर व घंटागाडीत टाकला. मोर्णा स्वच्छ झालीच पाहिजे या भावनेतून सर्वजण मन लावून काम करताना दिसत होते. विशेष म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार किंवा दुर्घटना न घडता ही मोहिम खूपच शिस्तबध्दपणे व शांततेने पार पडली.

मोहिमेकरीता आवश्‍यक असणारी साधने व साहित्य मनपाकडून पुरविण्यात आले. यावेळी सर्पमित्र पथक, वैद्यकीय सहायता पथक, पाणी व्यवस्थापन, साहित्य पुरवठा, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथक नदीकाठी हजर होते. ठेकेदार दीपक कारगल यांनी स्वच्छतेसाठी पोकलेनची सेवा मोफत उपलब्ध करुन दिली.

जिल्हाधिकारी म्हणाले की, 13 जानेवारीपासून सुरुवात झालेल्या मोर्णा स्वच्छता मोहिमेला लोकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. लोकांनी आज दिलेला प्रतिसादही कौतुकास्पद होता. नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत स्वच्छतेची ही मोहिम सुरुच राहणार आहे. यापुढेही दर शनिवारी लोकसहभागातून नदी स्वच्छ केली जाईल. जोपर्यंत नदी स्वच्छ होत नाही, तोपर्यंत स्वच्छता मोहिम सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या मोहिमेत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, त्यांच्या पत्नी तथा वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, नगरसेवक हरिष अलीमचंदानी, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप पाटील, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीर, तहसिलदार राजेश्वर हांडे, राहूल तायडे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी, बचतगटाच्या महिला, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी/कर्मचारी, पोलीस, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिक, वयोवृध्द नागरिक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक असे किमान अडीच हजार जण सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)