जिम्नॅस्टिक्‍समधील नवे आशास्थान ‘मेघना रेड्डी’

अमित डोंगरे 

भारतीय जिम्नॅस्टिकला जागतिक स्तरावर ओळख व मान देण्याचे काम दीपा कर्माकरने केले आता रिदमीक जिम्नॅस्टिक प्रकारात तेलंगणाची मेघना रेड्डी दीपाचा वारसा पुढे नेण्यासाठी सज्ज झाली आहे. 2020 साली जपानमध्ये होणाऱ्या ‘टोकियो ऑलिम्पिक’ मध्ये भारताला दीपा बरोबरच मेघनाकडूनही पदकाची आशा निर्माण झाली आहे ती तिची गेल्या तीन वर्षातील कामगिरी पाहून. आता राष्ट्रकुल स्पर्धेत मेघनाची कामगिरी कशी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये व्हॉल्ट प्रकारात दीपाला ब्रॉंझ पदकाने जरी हुलकावणी दिली असली तरी ‘प्रोदुनोव्हा व्हॉल्ट’ वरील तिच्या वर्चस्वाची चर्चा चांगलीच रंगली होती, तिच्याकडून प्रेरणा घेत मेघनाने रिदमीक प्रकारात सहभागी होण्याचा विडा उचलला आणि आपल्या सरस कामगिरीने तिने जाणकारांना तिची दखल घेणे भाग पाडले. तिच्या कामगिरीत असेच सातत्य राहीले तर टोकियोत तिने पदक मिळवले तरी कोणाला आश्‍चर्य वाटणार नाही. त्यासाठी ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी तिला सरावासाठी भरपूर स्पर्धा खेळायच्या आहेत. त्यात विश्‍वविजेतेपद स्पर्धा आहे, आत्ता सुरू होणारी राष्ट्रकुल स्पर्धा आहे, शिवाय सप्टेंबरमध्ये होणारीा आशियाई स्पर्धा आहे. यातील एका स्पर्धेत जरी तिने पदक मिळवले तरी तिला टोकियो ऑलिम्पिक कोटा मिळेल.

दीपा कर्माकरप्रमाणेच आत्ताच केवळ 19व्या वर्षी मेघना भारतीय जिम्नॅस्टिकची ‘पोस्टर गर्ल’ बनली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या सामन्यात तिने केलेली कामगिरी थक्क करणारी आहे. राजधानी दिल्लीत झालेल्या पात्रता फेरीच्या स्पर्धेत मेघनाने 54 गुणांची नोंद केली. 2014 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेतीलाही इतकेच गुण मिळाले होते व पदक देखील. त्यामुळे मेघनाचा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे. तिने गेल्या तीन मोसमात जितक्‍या स्पर्धा खेळल्या त्यात पन्नास पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत ही कामगिरी ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्या खेळाडूंच्या जवळपास जाणारी ठरली आहे त्यामुळेच भारताला जिम्नॅस्टिकमध्ये मेघनाकडून ऑलिम्पिक पदकाची आशा आहे.

प्रशिक्षकांनाही विश्‍वास 
दीपा कर्माकरचे जे प्रशिक्षक आहेत तेच विश्‍वेश्‍वर नंदी आणि जयप्रकाश चक्रवर्ती मेघनाचे देखील प्रशिक्षक आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मेघना सध्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी कसून सराव करत आहे. याशिवाय ती दरवर्षी किमान सहा महिने ओहीओ येथे माजी ऑलिम्पिक खेळाडू वाखरा फीलोयुकडे सराव करते. तिच्या प्रशिक्षकांना मेघनाच्या ऑलिम्पिक यशाची खात्री आहे. वयाच्या अकराव्या वर्षी तिने या खेळाला सुरुवात केली आणि आज ती राष्ट्रकुल स्पर्धेत वयाच्या केवळ 19 व्या वर्षी सहभाग घेत आहे इतकी तिची कामगिरी सरस आहे. केरळमध्ये 2015 साली झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने एक सुवर्ण आणि एक ब्रॉंझपदकाची कमाई केली. त्याचवर्षी बुडापेस्ट येथील स्पर्धेतही सहभागी झाली होती. मात्र, त्यात तिला पदकाविनाच परतावे लागले. 2016च्या आठव्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत तिच्या कामगिरीचा जोरावर तिला ‘पीपल्स चॉईस’ पुरस्कार देखील मिळाला. वयाच्या सतराव्या वर्षी तिने वरिष्ठ स्पर्धेत विजेतेपद पटकावले तेव्हाच विश्‍वेश्‍वर नंदी यांनी तिला उज्ज्वल भविष्य असल्याचे म्हणले होते, आज तेच तिचे प्रशिक्षक आहेत.

इंग्लंडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बाथ करंडक स्पर्धेत तिने ब्रॉंझपदकाची कमाई केली आणि त्याच वेळी जागतिक स्तरावर प्रथमच तिचे नाव झळकले. त्यानंतर ती जिम्नॅस्टिकच्या आधुनिक सरावासाठी तीन महिने युक्रेनला गेली आणि क्‍लब अंतर्गत स्पर्धांमध्ये तिने मानांकित खेळाडूंनाही मागे टाकत आपला दबदबा प्रस्थापित केला. बाथ करंडक स्पर्धेनंतर तिने लंडन चषकातही ब्रॉंझपदकाची कमाई केली. त्यानंतर इटलीत झालेल्या स्पर्धेत तिने ब्रॉंझ पदक मिळवताना भारतीयांकडून सर्वाधिक गुणांचा विक्रम साकार केला. सध्या ती राष्ट्रकुल स्पर्धेतील यशासाठी प्रचंड मेहनत घेत असून या स्पर्धेतील पदक तिला टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरवणार आहे. दीपा कर्माकर व्हॉल्ट प्रकारात तर मेघना रिदमीक प्रकारात जिम्नॅस्टिकमध्ये भारताच्या आशास्थान बनल्या आहेत. तिने जर ऑलिम्पिक पदक मिळवले तर ते भारताचे पहिलेच ऑलिम्पिक जिम्नॅस्टिक पदक ठरेल.

आईकडून गिरवले धडे 
मेघनाने आपली आई प्रवीणा रेड्डी यांच्याकडेच रिदमीक जिम्नॅस्टिकचे प्राथमिक धडे गिरवले. प्रणीता या देखील राष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू होत्या त्यामुळे मेघनाला घरातील क्रीडा संस्कृतीचा खुप मोठा लाभ झाला. ती जशी खेळामध्ये दिवसेंदिवस प्रगती करत आहे तशीच शिक्षणातही गांभीर्याने वाटचाल करत आहे. तिचे आई-वडील त्यासाठी तिच्यावर कोणतेही दडपण आणत नाहीत ही मेघनाची सर्वात जमेची बाजू आहे. कारण दहावी आणि बारावीची परीक्षा आली की पालक मुलांचे खेळणे बंद करतात आणि त्यांची पुढे जाण्याची संधी घालवतात. यातूनच चांगले खेळाडू ‘ड्रॉप आऊट’चे शिकार बनतात. एकदा का एखाद्या खेळाडूचे वर्ष शिक्षणाच्या दडपणामुळे मैदानाबाहेरच वाया गेले तर त्याला पुन्हा ट्रॅकवर यायला खूप वेळ लागतो. पहिल्यापासून पुन्हा सराव करावा लागतो, विविध स्थानिक स्पर्धा खेळाव्या जागतात आणि तोपर्यंत कित्येक स्पर्धक निर्माण झालेले असतात ही चूक मेघनाच्या घरच्यांनी केली नाही. आज म्हणूनच तिचे सातत्य कायम राहीले.

आर्थिक मदतीची अपेक्षा 
युक्रेनसह ग्रीस वा इतर युरोपीय देशात सध्या मेघना सरावासाठी तसेच स्पर्धांसाठी जाते यासाठी खूप मोठा खर्च येतो. साधारण दरवर्षी पंचवीस लाख रुपये इतकी रक्कम तिच्या खेळावर तिच्या कुटुंबीयांनाच खर्च करावी लागते. 2014 नंतर काही प्रायोजक पुढे आले त्यांनी मदतीचा हात दिला आहे, पण तो पुरेसा नाही. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या टी.ओ.पी. (टार्गेट ऑलिम्पिक पोडीअम) योजनेअंतर्गतही तिचा करार यावर्षी संपणार आहे. त्याचे नूतनीकरण होण्याची शक्‍यता आहे. मात्र, त्यासाठी तिला राष्ट्रकुल आणि त्यानंतरच्या आशियाई स्पर्धेत पदक मिळवलेच पाहिजे. देशातील प्रशिक्षकांपेक्षा परदेशातील प्रशिक्षकांच्या अकादमीत सराव करण्यामुळे खूप मोठा आर्थिक भार सोसावा लागतो. येत्या काळात तिला खासगी प्रायोजकांबरोबरच केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेही जर आर्थिक मदत केली तर ती ऑलिम्पिकला पदक मिळवू शकेल. त्यासाठी तिचे कुटुंबीय आशावादी आहेत.

टी. ओ. पी. म्हणजे काय ? 
केंद्र सरकार, क्रीडा मंत्रालयाने टी.ओ.पी. (टार्गेट ऑलिम्पिक पोडीअम) ही योजना जाहीर केली. या अंतर्गत देशातील अनेक क्रीडा प्रकारातील अव्वल खेळाडूंना या योजनेत सहभागी करून घेण्यात आले. भारतीय खेळाडू राष्ट्रकुल, आशियाई, आफ्रो-आशियाई, जागतिक विजेतेपद आणि विश्‍व स्पर्धेत ज्या ज्या खेळात सहभागी होतात आणि पदके जिंकतात त्यांना या योजनेत करारबद्ध करण्यात येते. त्यांना आर्थिक मदत पुरवली जाते शिवाय जागतिक दर्जाच्या सोई-सुविधा पुरवल्या जातात. ठराविक काळात त्यांची कामगिरी पाहिली जाते व त्यांना या योजनेत ठेवायचे की बाहेर काढायचे याबाबत निर्णय घेतला जातो.

सध्या या योजनेत मैदानी स्पर्धेतील एकोणीस, तिरंदाजीत सोळा, बॅडमिंटनमधील सहा, मुष्टियुद्धात आठ, नेमबाजीत आणि कुस्तीत प्रत्येकी सतरा आणि याटींगमध्ये दोन असे खेळाडू जोडले गेले आहेत. त्यात दीपा कर्माकर, मेघना रेड्डी आणि इतरही खेळांतील खेळाडूंच्या नंतर समावेश करण्यात आला आहे. इंडिया इन्फ्रास्ट्रक्‍चर फायनान्स कंपनी व अर्थ मंत्रालयाने या योजनेसाठी तीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे. दरवर्षी दहा कोटी रुपये खेळाडूंच्या प्रशिक्षणावर खर्च केले जात आहेत. खेळाडूंना स्टायपेंड स्वरूपात जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयांचा निधी प्रत्येकी दिला जातो.

याव्यतिरिक्त भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे काही खेळाडूंना परदेशातही सरावासाठी पाठवले जाते. त्यांना जागतिक पातळीवरच्या प्रशिक्षकांकडे सरावाची संधी यातून मिळते. त्यासाठीही प्राधिकरण निधी देते. तसेच खेळाडूंना काही अद्ययावत साहित्य विकत घेण्यासाठीही आर्थिक सहाय्य दिले जाते. जेणेकरून खेळाडूंच्या सर्व अपेक्षा पूर्ण व्हाव्यात व त्यांनी केवळ खेळावर, सरावावर आणि स्पर्धांवर लक्ष केंद्रित करावे व देशासाठी सरस कामगिरी करावी.
मेघना रेड्डी देखील या योजनेचा एक भाग बनली आहे. पण तिला जो खर्च येतो तो सर्व करणे क्रीडा मंत्रालयाला आणि प्राधिकरणाला शक्‍य नाही म्हणूनच खासगी प्रायोजकांनी पुढे येत मेघनाला मदत केली तर तिचा आत्मविश्‍वास उंचावेल व ऑलिम्पिक पदकाची खात्री निर्माण होईल.

मेघना रेड्डी एकटीच नव्हे तर अशा अनेक खेळाडू आपल्या देशात तयार होत आहेत. ऑलिम्पिक खूप पुढचा टप्पा झाला, पण टी.ओ.पी. योजनेची व्याप्ती आणखी वाढवून जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही या योजनेत विचार केला जावा तरच खरोखर क्रीडा संस्कृती या देशात रुजेल. या योजनेबरोबरच केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची ‘खेलो इंडिया’ ही मोहीमही याकामी लाभदायक ठरेल. केवळ 2020 चे टोकियो ऑलिम्पिक नव्हे तर 2024 व 2028 चे देखील ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंना मदत केली पाहिजे व या दोन्ही योजनांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे तरच देशाला खऱ्या अर्थाने ‘ऑलिम्पिक विजेते’ खेळाडू गवसतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)